नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा मार्फत जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ज्ञानाई शेतकरी उत्पादक कंपनी भोणे तालुका जिल्हा नंदुरबार यांच्या प्रकल्पाची निवड करण्यात आलेली आहे.
ज्ञानाई शेतकरी उत्पादित कंपनी मार्फत मिरची व मसाले प्रक्रिया उद्योग बाबतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आलेली आहे. नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार राकेश वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट प्रकल्पाचा भाग म्हणून कृषी विभागामार्फत मिरची पिकाची शेती शाळा राबवण्यात येत आहे.
सदर शेती शाळेच्या वर्गामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी प्रदीप लाटे , मूल्य साखळी तज्ञ उमाकांत पाटील व घारडा केमिकल्स कंपनीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रल्हाद अजगर ,प्रदेश व्यवस्थापक गौरव पाटील , कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील हे उपस्थित होते.
ज्ञानाई शेतकरी उत्पादक कंपनी च्या सभासदांपैकी 30 सभासदांची निवड करून त्यांचे शेतावर मिरची उत्पादनाचे बाजाराभिमुख पीक प्रात्यक्षिके राबवण्यात येत आहेत . तसेच मूल्य साखळी विकास शेतीशाळेच्या माध्यमातून मिरची पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाबाबत पिकाच्या वाढीच्या अवस्थांनुसार मार्गदर्शन केले जात आहे.
या शेतीशाळा वर्गामध्ये मूल्य साखळी तज्ञ उमाकांत पाटील यांनी स्मार्ट प्रकल्प ची पार्श्वभूमी व शेतकऱ्यांना मिरची पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. घारडा कंपनीचे प्रल्हाद अजगर यांनी मिरची पिकातील कीड व रोग नियंत्रण बाबत महिती दिली. कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील व कृषी सहाय्यक सुवर्णा अहिरे यांनी हरभरा बियाण्यास बीज प्रक्रिया चे महत्व सह प्रात्यक्षिक करून दाखवत माहिती दिली. तसेच आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागुल यांनी शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची हाताळणी व फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती पर माहिती दिली.
या कार्यक्रमास ज्ञानाई शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विश्वनाथ धनगर , प्रगतशील शेतकरी रजेसिंग राजपूत, नवलसिंग राजपूत,एकनाथ माळी, सदस्य सुदाम महाले व कंपनीचे मिरची उत्पादक पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागुल यांनी केले तर शेतीशाळेच्या नियोजनासाठी घारडा केमिकल्स कंपनीचे प्रदेश व्यवस्थापक गौरव पाटील , मार्केटिंग ऑफिसर अमेय माडिवाले यांनी सहकार्य केले.








