नंदुरबार l प्रतिनिधी
दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत आज शनिवार 25 नोव्हेंबर 2023 व रविवार 26 नोव्हेंबर, 2023 या दोन्ही दिवशी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निदेशांनुसार राज्यामध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 27 ऑक्टोबर, 2023 ते 09 डिसेंबर, 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदींच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांनी त्यांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत.
शिबिरामध्ये मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरीकांचे मतदार नोंदणी, दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरून घेण्यात येणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विशेष शिबिरांना भेटी देऊन तेथील कामकाजाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करावे अशा सुचना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत.
छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, 2024 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र नागरीकांनी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेण्यासाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मनीषा खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.








