नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्याच्या जनजाती गौरव सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून शानदार शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय क्षेत्रातून आलेल्या 32 आदिवासी नृत्य पथकांसह शेकडो जणांकडून कालपासून तीन दिवस आदिवासी कला संस्कृतीचे प्रदर्शन केले जाणार आहे.
नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर काल 15 नोव्हेंबर 2023 रोजी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुल परिसर, खामगांव रोड, येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी हा जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला असून हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध भागातील आदिवासी ग्रामस्थ आणि कला संस्कृती क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहिले. या महोत्सवाच्या ठिकाणी 32 नृत्य पथकातील 800 हून अधिक कलाकार आपी कला सादर करतील. औषधी वनस्पती पासून बनवलेल्या औषधी, आदिवासी भागातील विविध खाद्यपदार्थ त्याचबरोबर बांबू वगैरे पासून बनविलेल्या वस्तू यासह हस्तकलेचे वैविध्य सादर करणारे 200 स्टॉल लावण्यात आले आहेत. उद्घाटनापूर्वी राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवासाठी नंदुरबार पोलीस मुख्यालय मैदानाच्या हेलिपॅडवर आगमन झाले.
त्यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, यांनी राज्यपाल श्री. बैस व मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले.
मुख्य कार्यक्रम स्थळी व्यासपीठावरआदिवासी संस्कृतीचे प्रतीक म्हणून मोरपिसांचा बनवलेला उभा टोप राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह प्रमुख पाहुण्यांना आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते घालून स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा म्हणजे लहान मूर्ती भेट देण्यात आल्या.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, राज्यपाल यांच्या सचिव श्वेता सिंघल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री विविध यंत्रणांचे अधिकारी, पदाधिकारी, अधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








