नंदुरबार l प्रतिनिधी
कारखान्याने चालू गाळप हंगाम 2023-24 ऊस दराचा पहिला हप्ता रक्कम रु.2600 प्रमाणे जाहिर केला असल्याची माहिती संचालक सचिन सिनगारे यांनी दिली.
अधिक माहिती देताना सांगितले की, 24 गटातून 15087 हे.आर ऊस क्षेत्राची नोंद कारखान्याकडे झालेली असून 12 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्टे आहे.
भागात पावसाची सरासरी कमी असल्याने ऊसाच्या वजनामध्ये घट होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी गाळपाचे दिवस कमी होतील त्यामुळे यावर्षी साखर उतारा देखील कमी राहण्याची शक्यता आहे तसेच कारखान्याने गाळप क्षमता वाढवल्यामुळे आर्थिक बोजा असताना देखील तोटा सहन करत समोर ठाकलेल्या दुष्काळा अभावी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून कारखान्याने पहिला हफ्ता रु.2600/- प्रमाणे जाहिर केलेला आहे.
कारखान्याने मागील गळीत हंगाम 2022-23 मध्ये गळीतास आलेल्या ऊसाला दुसरा हप्ता दिवाळीपुर्वी देण्याचे घोषित केलेले होते परंतू दसऱ्यापुर्वीच अदा करून रु.2450/- प्रमाणे सरसकट एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर देऊन आपला शब्द पाळला आहे.यावर्षी देखील उच्चांकी, सरसकट व वेळेत ऊस दराची परंपरा कायम राखत जाहिर केलेला दर हा शेतकऱ्यांना परवडणारा ऊस दर जाहिर केला आहे.
पुढच्या काळात चांगला उतारा व अपेक्षीत ऊस दर मिळण्यासाठी ऊसाचे व्हरायटीत बदल केला असून लागवडीसाठी लागणारे चांगल्या प्रतिचे ऊस बियाणे, प्रेसमड उधारीने उपलब्ध करून दिले आहे. पारदर्शक व योग्य व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांची विश्वासार्हता कायम ठेवली आहे, अशी माहिती संचालक सचिन एस. सिनगारे यांनी दिली.
ऊसाची कमतरता भासली की बाहेरचे कारखाने भागातील ऊस घेऊन जातात अतिरीक्त ऊस असताना इतर कारखाने येत नाहीत तर भागातील आपलाच कारखाना सुपूर्ण ऊसाचे गाळप करतो. गाळप क्षमता वाढल्यामुळे पुढच्या काळात वेळेत ऊस तुटणार आहे. त्यामुळे सीमाभागातील, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील इतर कारखान्यांच्या भुलथापाना बळी पडु नये. शेतकऱ्यांचा जो विश्वास आयान शुगरवर आहे तो विश्वास सार्थ ठरवू. असे आवाहन केले.
ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुकदार व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.








