नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी महिला भगिनींना आत्मनिर्भर करण्यासाठी संसदरत्न खासदार डॉ हिना गावित यांनी आदिवासी विकास विभाग व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांना शेळी वाटपाचा मार्ग मोकळा करून दिला असून आदिवासी विकास विभागातर्फे धडगाव तालुक्यातील बचत गटांचे केळी, पपई व कापसावरील प्रक्रिया उद्योग सुरू केले जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली. यामुळे धडगाव तालुक्यातील हजारो महिलांच्या हाताला काम मिळणार आहे, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित भाषणत म्हणाले.
ते धडगाव येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित महिला बचत गटांच्या शेळी गट निवड पत्र वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत पावरा, सुभाष पवार, माजी नगराध्यक्ष लतेश मोरे व स्थानिक मान्यवरांसह महिला बचतगटांच्या प्रमुख उपस्थित होते. यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक गावाला जल मिशन योजना आणि ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून गावातील रस्ते विकास करण्यात येत असून प्रत्येक ग्रामपंचायत च्या सरपंचांनी वेळेवर निधीचा उपयोग करावा असे आवाहन देखील केले. खासदार डॉ. हिना गावित यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिल्या जात असलेल्या अर्थसाह्य योजनांची माहिती दिली. दुर्गम भागातील शेतकरी सधन व्हावा यासाठी नर्मदा आणि तापी योजना लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचेही खासदार गावित म्हणाल्या. लीना बनसोड यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.








