नंदुरबार l प्रतिनिधी
दुर्गम भागातील गावपाड्यांवरील रस्ते विकास व्हावा आणि तेथील दळणवळणाला गतिमानता यावी यासाठी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या रस्ते कामांचे आदेश पत्रांचे वाटप तळोदा तालुक्यातील विविध 27 ग्रामपंचायतींना रापापूर या दुर्गम गावी पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात करण्यात आले.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, संसदरत्न खा. डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. कुमुदिनी गावित, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी, जिल्हा परिषद सदस्य भरत पवार, जितू महाराज तथा जितेंद्र पाडवी, डॉ. स्वप्निल बैसाणे, रूपसिंग पाडवी, रापापूरचे पंचायत समिती सदस्य यशवंत ठाकरे, दाज्या पावरा आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
विशेष असे की, तळोदा तालुक्यातील रापापुर या दुर्गम गावात रात्री पार पडलेल्या या सरपंच मेळाव्याला लगतच्या गावपाड्यातील ग्रामस्थांसह पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्यासह महिलांची लाक्षणिक उपस्थिती होती. मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि खा. डॉक्टर हिना गावित यांच्या कार्याने मोठा वर्ग प्रभावीत असल्याचे त्या मेळाव्यात प्रामुख्याने दिसून आले.
दुर्गम आदिवासी बांधवां चे स्थलांतर कायमचे थांबावे, त्यांची बेरोजगारी दूर होऊन त्यांना गावातच रोजगार मिळावा, स्वतःचे विविध उद्योग सुरू करून ते आत्मनिर्भर बनावे आणि उंच दर्जाचे जीवनमान त्यांना जगता यावे; हेच आपल्या कार्याचे ध्येय असून आदिवासी विकास विभागाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना गावागावात पोहोचाव्या यासाठी प्रयत्न आहे.
आजचा मेळावा त्यासाठीच घेण्यात आला असून कागदपत्रांची पूर्तता करून प्रत्येक आदिवासी ग्रामस्थांनी प्रत्येक समाजाच्या घटकाने घरकुल योजनांचा लाभ घ्यावा, सरकारने सुरू केलेल्या शिधा वाटपाचा लाभ घ्यावा तसेच बचत गटांसाठी सुरू करण्यात आलेल्या शेळी वाटपाचा देखील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
नर्मदा आणि तापी नदीतील पाण्याचा पुरेपूर उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावातील सिंचन क्षेत्र वाढवायचे आपले उद्दिष्ट आहे त्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे.
त्यामुळेच नर्मदा डॅम मधील पाणी आपल्या जिल्ह्यात वळवून सिंचन करण्याची योजना असो की तापी नदीतील पाणी नंदुरबार पर्यंत नेण्याची योजना असो अशा मोठ्या कामांना लवकरच साकारले जाणार आहे आणि त्यामुळे गावातील शेतकरी आणि आदिवासी बांधव यांच्या जीवनात कायापालट घडलेला दिसेल, असा विश्वास खा.डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला. व गाव विकासाच्या योजना व रोजगार देणाऱ्या वैयक्तिक योजनांची सविस्तर माहिती दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी देखील आपल्या भाषणातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या कामांची आणि योजनांची माहिती दिली. एकही गाव विकासापासून वंचित राहू नये,
पाणी योजनेपासून वंचित राहू नये तसेच रस्ते गटारी यापासून वंचित राहू नये यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद आणि आम्ही कटिबद्ध आहोत; अशी ग्वाही डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिली. डॉ. शशिकांत वाणी यांनी खा.डॉ. हिना गावित व मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या विकास कार्याविषयी माहिती देऊन उपस्थित सरपंचांना पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले








