शहादा l प्रतिनिधी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये शहादा व धडगाव या तालुक्यांचा समावेश न केल्याने शेतकरी बांधवांसह सर्व सामान्य जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे.वेळेवर व पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने पीक येणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या यादीत शहादा व धडगाव तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे,राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यांची दुष्काळी यादी जाहीर केली आहे.यांत नंदुरबार जिल्ह्यातील फक्त नंदुरबार तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे.वास्तविक यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस वेळेवर व पुरेशा प्रमाणात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.शहादा व धडगाव तालुक्यातील विविध गावांत जाऊन शेतशिवारातील पिकांची पाहणी केली असता खरे चित्र समोर येणारे आहे.परिसरात पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे शेतशिवारातील भेटीत निदर्शनास आले आहे.
या दोन्ही तालुक्यांत पावसाळा संपत आला तरी सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी असल्याने तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील अनेक बंधारे आजही कोरडे असून पावसाच्या भरवशावर केलेला हंगाम वाया जाणार आहे.अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांकडून पीक वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने पिके करपून आर्थिक झळ सोसावी लागत आहे.शेती उत्पन्नासाठी केलेला भांडवल खर्च वाया गेला आहे.
जनावरांसह जनतेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील शेतक-यांना या संकटातून सावरता यावे यासाठी महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून नवीन आणेवारी करावी.शहादा व धडगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा अशी मागणी शासनाकडे दीपक पाटील यांनी केली आहे.








