नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात नंदुरबार आगारातील चालकाकडून 10 हजाराची लाच स्विकारतांना सफाई कामगार व खाजगी वाहन चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार हे एस.टी.महामंडळ येथे चालक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या प्रकृती कारणास्तव ते मे २०२३ पासून वैद्यकीय रजेवर आहेत. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांना नोकरीवर रुजू व्हावयाचे होते. यासाठी तक्रारदार यांना जिल्हा रुग्णालयातून ‘फिट फॉर ड्यूटी सर्टीफिकेट’ ची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदार हे सदरचे प्रमाणपत्र घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले असता तेथे नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात सफाईगार म्हणून कार्यरत असलेल्या जयेश शंकर तेजी याच्याशी त्यांची भेट झाली.
यादरम्यान, जयेश तेजी यांनी तक्रारदारांना फोनवरुन व स्वत: जिल्हा रुग्णालय येथे लिपीक असल्याचे भासवून तसेच त्याचा साथीदार खासगी इसम हा डॉक्टर असल्याचे भासवून जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिटनेस सर्टीफिकेट मिळवून देतो, असे सांगितले. त्या मोबदल्यात तक्रारदाराडून पैशांची मागणी केली. सुरुवातीला जयेश तेजी याने १२ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार काल तक्रारदाराकडून सदरची रक्कम स्विकारत असतांना पंच साक्षीदारांसमक्ष जयेश तेजी याला रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक माधवी वाघ यांच्यासह पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोहेकॉ.विलास पाटील, देवराम गावित, अमोल मराठे, विजय ठाकरे, ज्योती पाटील, संदिप नावाडेकर, मनोज अहिरे, जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे..