नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून उद्या दि.२९ ऑक्टोंबर रोजी शहरातील मीरा प्रताप लॉन्स येथे जिल्हा युवक काँग्रेस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले महाराष्ट्र राज्याचा दौरा करीत आहेत.जळगाव जिल्ह्यानंतर नंदुरबार येथे आढावा घेणार आहेत.या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे येथील पटेल रेसिडेन्सीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश निकम, शहादा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल, माजी नगरसेवक रियाज कुरेशी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.नाईक यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षात सध्या मरगळ आली आहे.हि मरगळ दुर करण्याकरिता व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मेळावे घेण्याचे ठरवले आहे. त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात आयोजित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते दुपारी २.३० वाजता शहादा शहरातील मिरा प्रताप लॉन्स येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसतर्फे केले आहे.








