नंदुरबार | प्रतिनिधी-
दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्टतर्फे दि. ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाला गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, कृषि मंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शहरातील जी.टी.पी. महाविद्यालयाच्या पटांगणावर हा महोत्सव होणार असल्याची माहिती स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख जीवन देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री.देवरे म्हणाले, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे व मान्यवरांच्या हस्ते मातीचे पूजन करून कृषीमहोत्सवास सुरुवात होणार आहे. यामध्ये खान्देश विभागातील हजारो तरुण सेवेकर्यांनी स्वयंप्रेरणेने आयोजक आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनातून अनोखी कृषी क्रांतीच घडविण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर थेट परराज्य व परदेशात देखील याच उत्साहात कृषी महोत्सवास मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे.
यात मोफत आरोग्य शिबिर व कुपोषण मुक्त गाव तसेच कृषी प्रदर्शन व तज्ञांचे चर्चा करणार तसेच खान्देश, कृषी संस्कृती व पशु-गौवंश प्रदर्शन तसेच वनौषधी, रानभाज्या व देशी बियाणे प्रदर्शन होणार आहे.
दि.३ रोजी सकाळी ९ वाजता कृषीदिंडीने महोत्सवाला सुरुवात होऊन सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होईल. यावेळी प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे भाविकांशी हितगुज करणार आहेत. त्यानंतर विविध पिकांच्या विषमुक्त शेती बाबत तज्ञांचे चर्चासत्र होऊन दुपारच्या सत्रात ३ वाजेपासून शेतकरी, वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर वधू-वर परिचय मेळावा हा सर्व जाती-धर्मीयांसाठी व विनामुल्य पद्धतीचा आहे. तसेच दि.४ रोजी सकाळी ९ वाजता पशु-गौवंश या विषयातील तज्ञाचे चर्चासत्र आयोजित केले आहे. दुपारी १२ वाजेपासून आरोग्य शिबीर व कुपोषणमुक्त गाव या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. दि.५ तारखेला पहिल्या सत्रात सकाळी पर्यावरण तज्ञ व सायबर क्राईम या विषयांवर चर्चासत्र आयोजित केले आहे. दुपारच्या सत्रात १ वाजता बेरोजगार मुल-मुली/शेतकरी, व्यावसायिकांसाठी उद्योग व्यवसाय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे, असेही श्री.देवरे यांनी सांगितले.