नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत निकृष्ठ दर्जाची कामे होत असल्याने मागील सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्याच्या मागणी नंतर कार्यकारी अभियंत्यांवर कारवाईची मागणी करत ठराव केला होता. या कारवाईच्या ठरावानंतरही संबंधित अभियंता कार्यरत असून त्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसात सुमारे साडेतेवीस कोटी रुपयांची बीले अदा केली कशी? असा संतप्त सवाल करीत मुख्य कार्यकारी अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत जि.प.सदस्यांनी सभेतून वॉकआऊट केले.
नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा काल याहामोगी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्यासह व्यासपीठावर महिला व बालकल्याण सभापती संगिता गावित, शिक्षण सभापती गणेश पराडके, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार तसेच स्थायी समिती सदस्य भरत गावित, रतन पाडवी, विजय पराडके, राया मावची, एैश्वर्या रावल, जयश्री पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच जलजीवन मिशनच्या झालेल्या कामांचा आढावा घेत असतांना संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी निकृष्ठ कामे असतांना बीले अदा केल्याने त्यांच्यावर ठेकेदारांकडून रक्कम घेतल्याचा आरोप करत कारवाईची मागणी मागील सर्वसाधारण सभेप्रसंगी करण्यात आली होती. त्यावेळी सर्व ५६ सदस्यांच्या एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र यास दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील संबंधित अभियंता अजूनही कार्यरत असून दि.२३ व २४ अशा दोनच दिवसात तब्बल २३ कोटी ५७ लाख रुपयांहून अधिकची बीले ७० ठेकेदारांना अदा करण्यात आली आहेत.
सर्वसाधारण सभेत ठराव केलेला असतांनाही संबंधित अभियंत्यांवर कारवाई का करण्यात आली नाही? तसेच कोट्यवधींची बीले अदा झाली कशी? या विषयावर स्थायी समिती सदस्य आक्रमक झाले. जि.प.सदस्य रतन पाडवी व भरत गावित यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप केला. भरत गावित म्हणाले की, भ्रष्टाचार करणाऱ्यांना जि.प.प्रशासन पाठीशी घालत आहे. जोपर्यंत संबंधित अभियंत्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सभेचे कामकाज होवू देणार नाही असा पावित्रा घेतला.
जनतेचा, शासनाचा पैसा आदिवासींसाठी असतांना त्याचा योग्य पद्धतीने विनियोग होत नसेल, सभागृहात झालेल्या ठरावाला किंमत नसेल तर सभा का घेतात व ठराव का करतात? असाही सवाल भरत गावित यांनी उपस्थित केला. यास रतन पाडवी, विजय पराडके, राया मावची यांनी समर्थन दर्शविले. यानंतर तासभर सभा तहकूब करण्यात आली. आजच संबंधित अभियंत्यांवर कारवाई करा, अन्यथा सभात्याग करण्याचा इशारा संतप्त सदस्यांनी दिला. तासभर उलटल्यानंतरही संबंधित अभियंत्यांवर कारवाई होत नसल्याने सदस्यांनी वॉकआऊट करण्याचा निर्णय घेतला. यावर जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावित यांनी पुढील सभेच्या आधी संबंधित अभियंत्यांवर कारवाई करु, आपण सभेचे कामकाज करु, अशी विनंती केली.
मात्र सदस्य संबंधित अभियंत्यावर कारवाईच्या मागणीसाठी ठाम होते. दरम्यान, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी जि.प. प्रशासनाला संबंधित अभियंत्यावर कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगितल्याने सदस्यांनी जि.प. प्रशासनच भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत अखेर सभेतून वॉकआऊट केले. त्यानंतरही अजेंड्यावरील उर्वरित पाच विषयांचे वाचन करुन विभागनिहाय आढावा घेण्यात आला. यानंतर सभा संपण्यापूर्वीच सभागृह सोडले. दरम्यान, अखेरच्या तीन विषयांचे वाचन करत असतांना सभागृहात एकही स्थायी समिती सदस्य उपस्थित नव्हते.








