सारंगखेडा l प्रतिनिधी
जळगाव येथे अन्नत्याग उपोषणाला बसलेले आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी ,मल्हार कोळी या समाज बांधवांच्या समर्थनार्थ तसेच कोळी समाजाच्या मागण्यांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी अनरदबारी ( ता. शहादा ) येथे काल कोळी महासंघातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोळी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात कोळी समाजातर्फे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर अनरद बारी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनात कोळी समाज बांधव ,भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी समाजाला आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता आली तर तीन महिन्यात तुमच्या प्रश्न सोडू निवडणूक काळात दिले असल्याचे सांगत दिलेला शब्द पाळला जात नसल्याने कोळी समाज आक्रमक झाला असून नंदुरबार जिल्ह्यात कोळी समाजाने आरक्षणाचा मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी कोळी समाज आक्रमक झाला असून नंदुरबार जिल्ह्यात कोळी समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आले. रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सरकारने कोळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या इशारा समाजबांधवांनी दिला आहे.
दरम्यान सकाळच्या सुमारास विविध मागण्यांसाठी कोळी बांधवांचे आंदोलन सुरू असताना वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी एका रुग्णाला घेऊन जाणारे खाजगी वाहनही या आंदोलनादरम्यान रहदारीत अडकले होते. परंतु संबंधित गाडीत रुग्ण आहे व त्याला दवाखान्यात तातडीने नेणे गरजेचे आहे असे समजल्यावर आंदोलकांनी माणुसकी दाखवत संबंधित वाहनाला जाण्यासाठी जागा करून देत.
रुग्णाला घेऊन वाहन तात्काळ मार्गस्थ झाले.
यावेळी आंदोलन स्थळी तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी भेट दिली समाज बांधवांतर्फे त्यांना आंदोलन स्थळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यात जात पडताळणी समितीवर न्यायाधीशाची नेमणूक करण्यात यावी, जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावे ,सेतू केंद्र आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी यांचे अर्ज जे सेतू केंद्र स्वीकारणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत., सुरेश धस समिती लागू करावी यांसह विविध मागण्यांच्या उल्लेख निवेदनात आहे.
निवेदनावर विजय शिंदे , शरद शिरसाठ,गणेश बागुल, भास्कर कुवर ,किरण वाघ हेमंत सूर्यवंशी, सुनीत चित्ते, गणेश कुवर, दादा कोळी दशरथ जाधव, रमेश कोळी किरण सोनवणे राकेश कुवर संजय सोनवणे अमरजित कुवर , नारायण कोळी , दगा कोळी , भरत कोळी , शिवाजी कोळी , किशोर चित्ते , ब्रिजलाल महाले हिरालल कोळी निंबा कोळीआदींसह समाज बांधवांच्या सह्या आहेत. आंदोलन स्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.








