नंदूरबार l प्रतिनिधी
विसरवाडी येथील व्यापारी यांचे घरावर दरोडा टाकणारी आंतरराष्ट्रीय टोळी अवघ्या काही तासातच जेरबंद करण्यात आली असून 2 स्थानिक आरोपीतांसह 5 नेपाळी संशयीत ताब्यात घेण्यात आले.
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भरत ऊर्फ मुन्ना गणेश अग्रवाल रा. व्यापार रा. कुंभार गल्ली, विसरवाडी ता. नवापूर हे घरात झोपलेले होते. त्यावेळी त्यांच्या घरात 20 ऑक्टोंबर रोजी रात्री 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास पाच सशस्त्र दरोडेखोरांनी घरात प्रवेश करुन भरत अग्रवाल व त्यांची पत्नी श्रीमती सोनाली अग्रवाल यांचे हातपाय व तोंड बांधून लोखंडी टॅमीने मारहाण करुन विळ्याचा धाक दाखविला. तसेच त्यांचे बेडरुमचे कपाटात ठेवलेले व श्रीमती सोनल अग्रवाल यांचे अंगावरील 2 लाख 06 हजार 250 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
त्याच दरम्यानच्या कालावधीत भरत अग्रवाल यांच्या घराच्या मागील बेडरुममध्ये झोपलेली त्यांची 13 वर्षाची मुलगी दिशा अग्रवाल हिला घरात काही तरी अनूचीत प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच तिने प्रसंगावधान राखत घरातून हळूच पळ काढला व गावातील तिचे काका यांच्या मार्फतीने पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ त्याठिकाणी विसरवाडी पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेले पोलीस पथक व शभरत अग्रवाल यांचे शेजारी राहणारे विसरवाडी पोलीस ठाणे येथे नेमणूकीस असलेले श्रीमती प्रिया मोरे व निखील टाकरे हे पोलीस दाम्पत्य त्याठिकाणी मदतीस धावून आले. याची चाहुल दरोडेखोरांना लागताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दरोडेखोर व पोलीसांमध्ये झटापट होवून 2 दरोडेखोरांना जागेवरच पकडण्यात पोलीसांना यश आले तर इतर 3 दरोडेखोर पळून जात असतांना लागलीच पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन 2 दरोडेखोरांना शिताफीने ताब्यात घेतले व 1 दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला.
ताब्यात घेतलेल्या चार संशयीत इसमांना विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी विसरवाडी पोलीस ठाणे येथे आणून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेबाबत सविस्तर माहिती कळविली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व घडलेला प्रकार समजून घेतला.
घटना अतिशय गंभीर स्वरुपाची होती म्हणून ताब्यात घेतलेले चार आरोपीतांना पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्वतः कौशल्यपूर्वक विचारपूस केली. तसेच गुन्ह्यात सहभाग असलेल्या इतर आरोपीतांची नावे निष्पन्न केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विसरवाडी पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथके तयार करुन गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीतांना अटक करुन जबरीने हिसकावून नेलेले सोन्याचे दागिने व रोख रुपये हस्तगत करुन आरोपीतांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश देवून गुजरात व इतर जिल्ह्यात रवाना केले.
दरम्यान भरत ऊर्फ मुन्ना गणेश अग्रवाल रा. व्यापार रा. कुंभार गल्ली, विसरवाडी ता. नवापूर यांच्या तक्रारीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 395, 397, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेले 4 संशयीत आरोपीतांकडून उर्वरीत आरोपीतांबाबत सविस्तर माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पथकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पळून गेलेल्या 1 आरोपीतास सुरत रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. सदरचे सर्व आरोपी हे बाहेर देशातील (नेपाळ) असल्याने अधिक संशय बळावला म्हणून मिळून आलेल्या आरोपीतांकडे अधिक चौकशी केली असता त्यांना गुन्ह्यात मदत करणारे इतर 2 स्थानिक आरोपी असे एकूण 7 आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यातील आरोपीतांकडून जबरीने हिसकावून नेलेले 2 लाख 6 हजार 250 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 70 हजार रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटार सायकल व 32 हजार 500 रुपये किमतीचे 7 मोबाईल असा एकूण 3 लाख 08 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या स्थानिक आरोपीतांपैकी आरोपी योहान जेनु गावीत रा. आंटीपाडा ता. नवापुर यांच्यावर यापूर्वी नंदुरबार व धुळे जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच योहान गावीत यानेच इतर आरोपीतांना विसरवाडी येथे दरोडा टाकल्यानंतर जास्त पैसे मिळतील असे अमिष दाखवून स्थानिक संशयित भाईदास गावीत यांच्या मार्फत बोलविले होते.बाबत सविस्तर माहिती दिली. या गुन्ह्यात चक्र मिनराम सुनार ऊर्फ चेतन बहादुर सोनी रा. तातापाणी ता. पंच्चुपुरी जि. सुरखेत (नेपाळ) ह.मु. शिवनगर ब्लॉक क्र. 6 टिकापुर जि. कैकाली (नेपाळ), हिक्करमल ऊर्फ हिमंत जनक शाही रा. सिरखानाता राजकोट जि. कालीकोट (नेपाळ), भरत धरमराज सोनी (सोनार) रा. मोहन्याल जि. कैलानी (नेपाळ), राजु केरे विश्वकर्मा रा. सोडपाणी ता. सुखल जि. कैलानी (नेपाळ), भाईदास साकऱ्या गावीत रा. बडीफळी नांदवन ता. नवापुर जि. नंदुरबार, योहान जेनु गावीत रा. आंटीपाडा ता. नवापुर,तुफान ऊर्फ तप्त बहादुर दिनेशसिंग ऊर्फ दिनेश रावत रा. थाकालीपूर पोस्टे लम्की जि. कैलाली (नेपाळ) ह.मु. कुरुभु रहाली, जैसी नगर, बँगलोर (कर्नाटक) यांना ताब्यात घेवून गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक किरण पाटील यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पथकांनी केली आहे. दरोड्या सारखा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील 5 आंतरराष्ट्रीय व 2 स्थानिक असे एकूण 7 आरोपीतांना अवघ्या काही तासातच ताब्यात घेणाऱ्या पथकांचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अभिनंदन करुन रोख बक्षिस देखील जाहिर केले आहे.
भरत ऊर्फ मुन्ना गणेश अग्रवाल यांची मुलगी कुमारी दिशा अग्रवाल हिने घटनेचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधान राखत धैर्याने परिस्थितीला सामोरे गेली. त्याबद्दल कुमारी दिशा अग्रवाल हिचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी अभिनंदन केले असून तिचा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी देखील प्रसंगावधान राखून धैर्याने परिस्थितीला सामोरे |जावे व तात्काळ स्थानिक पोलीस, डायल 112 किंवा नियंकक्ष कक्ष येथे संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.