नंदुरबार l प्रतिनिधी

गुजरातमधील वस्रोद्योग महाराष्ट्रातील नवापूर मध्ये गुंतवणूक करत आहेत, अशा प्रकारे महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या वस्रद्योगांना भरघोस इनसेंटिव्ह दिला जाणार असून, यासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासी भूमिपुत्रांना या उद्योगांनी रोजगार देणे बंधनकारक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
ते आज जनरल पॉलीफिल्म लिमिटेड कंपनीच्या सुमारे ८०० कोटी रूपये गुंतवणूकीच्या प्रकल्पाचे भूमीपूजन, जिल्हा औद्योगिक विकास मंहामंडळाची आढावा बैठक तसेच नावापूर टेक्सटाईल इंडरस्ट्रियल असोसिएशन सोबत झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार शिरिषकुमार नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती संगिता गावित जिल्हाधिकारी मनीषा खत्री, एमआयडीसी चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पी.डी. मलिकनेर, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, अधिक्षक अभियंता स्री. झंजे, कार्यकारी अभियंता गणेश वाघ, जनरल इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, उद्योजकांना प्रोत्साहन देताना ज्या आदिवासी बांधवांनी नवापूरच्या टेक्सस्टाईल पार्कच्या विकासासाठी जमीन दिली, त्यांनाही रोजगार देणे बंधनकारक असल्याचे संबंधित उद्योग व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिल्या आहेत. तसेच येथील आदिवासी बेरोजगार तरूणांमध्ये कौशल्य विकासित करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण प्रत्येक होतकरू तरूण बरोजगारांना उद्योग विभागाच्या एम.आय.डी.सी. च्या वतीने मोफत दिले जाईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवल्यास त्याला जलदगतीने तात्काळ मंजूरी दिली जाईल.
नवापूला येत असताना आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जेव्हा चर्चा केली, तेव्हा त्यांनी आदिवासी बांधवांनी राज्यातील उद्योग भरभराटीस प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या जमीनी देवून सरकारला सहकार्य केले आहे, त्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले.









