नंदुरबार l प्रतिनिधी
मद्य पिऊन घराजवळ आरडाओरड करत असल्याने रागाच्याभरात घराजवळच असलेल्या सुमारे दीडशे फूट खोल दरीत फेकून युवकाला जिवेठार केल्याची घटना धडगाव तालुक्यातील वलवाल गावाच्या शिवारात घडली.यापकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील वलवालचा रिचबारीपाडा येथील अमरसिंग डेका पावरा(वय २८)हा दारु पिऊन नटवर ओजाऱ्या पावरा (वय ४३) याच्या घराजवळ (दि.१४) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास आरडाओरड करत होता. यातून दोघांमध्ये वाद झाला.यामुळे रागाच्याभरात नटवर पावरा याने अमरसिंग पावरा यास सुमारे दीडशे फूट खोल दरीत ढकलून दिले.
अमरसिंग बराच वेळानंतरही घरी दिसून न आल्याने कुटूंबियांसह ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरु केला. यादरम्यान, अमरसिंग याचा मृतदेह खोल दरीत आढळून आलाग़्रामस्थांनी घटनेबाबत धडगाव पोलीसांना माहिती दिल्यावर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.पवार, पोलीस निरीक्षक आय.एन.पठाण यांनी भेट देवून पंचनामा केला आहे. अमरसिंग यास नटवर पावरा याने खोल दरीत ढकलून दिल्याच्या संशयावरुन डेका मोलजी पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलीस ठाण्यात संशयित नटवर पावरा याच्याविरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयितास काल धडगाव न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.