नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नंदुरबार शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे रविवार दि. 15 ऑक्टोंबर रोजी पहाटे 5: 30 वाजता माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम जयंती व वृत्तपत्र दिवसानिमित्त बस स्थानकावर प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले.
प्रतिवर्षी 15 ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार यंदाही नंदुरबार शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे सूर्योदयापूर्वी प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे नंदुरबार आगार प्रमुख संदीप निकम, ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत, रमाकांत पाटील, महादू हिरणवाळे, सचिन जोशी उपस्थित होते.याप्रसंगी सूर्यभान राजपूत म्हणाले की, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी वृत्तपत्रांचे सशक्त जाळे निर्माण केले होते.त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वृत्तपत्र विक्रेता दिवस होय. तर रमाकांत पाटील यांनी सांगितले की, समाज साक्षर व्हावा, जागृत व्हावा यासाठी अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. म्हणून कलाम यांची जयंती वृत्तपत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून देशात पाळण्यात येतो. तसेच आगार प्रमुख संदीप निकम म्हणाले की, मिसाइल मॅन म्हणून जगाला ओळख असलेले अब्दुल कलाम यांचे वृत्तपत्राशी जवळच नाते असताना 2020 मधील भारत महासत्ता होण्याबाबतचे व्हिजन अब्दुल कलाम यांनी मांडले होते.
वृत्तपत्र संघटनेचे राज्य सल्लागार उमेशचंद्र वाणी, राज्य कार्यकारणी सदस्य लक्ष्मण वाणी शहराध्यक्ष किशोर देसाई, उपाध्यक्ष नासिर खान मन्यार,सचिव राजेश काशीद यांनी संयोजन केले.अभिवादन कार्यक्रमास प्रकाश कुलकर्णी, सागर मोरे, योगेश पंडीत, मनोज बेलदार, नितीन वसईकर, प्रसाद महाजन, महेश भागवत, सागर मोरे,तुषार भोई,मनीष कुलकर्णी, रफीक मन्यार,दीपक कुलकर्णी व सर्व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.








