तळोदा l प्रतिनिधि
येथील प्रभाग क्रमांक 3 मधील (कोल्ली हट्टी) येथे महिन्या भरापासून लाईट बंद असल्याने लवकरात लवकर काम पूर्ण करावे व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असे सभापती बेबीबाई पाडवी यांनी सांगितले असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन दिले आहे.
सत्ताधारी नगरसेवक यांनी लेखी निवेदन दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून न. प. च्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
या निवेदनात म्हटले आहे संबंधित कार्यालयांचे अधिकारी सचिन पाटील तसेच ठेकेदार गणेश पाटील व त्यांच्या सोबत पाहणारी सर्व टीम वारंवार तक्रार करून देखील संबंधित ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी यांना मागील एक महिन्यापासून बेबीबाई पाडवी सभापती आरोग्य विभाग प्रभाग क्र 3 च्या नगरसेविका स्वतः तोंडी व मोबाईलद्वारे तक्रार करून सुद्धा माझ्या प्रभागातील कामाची दखल घेतली नाही.माझ्या प्रभाग आदिवासीबहुल असल्या कारणाने काम होत नाही का? व तेथे पावसाळ्यात वारंवार पूरग्रस्त स्थिती निर्माण होते तेथे वारंवार साप, सर्प, विंचू , बिबट इत्यादी जीवघेणे प्राणी आढळतात यासंबंधी माहिती सार्वजनिक असताना सुद्धा संबंधित ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांनी माझ्या प्रभागात कामाची दखल घेतली नाही व काम केले नाही याच्यात कधी रात्रीच्या अंधारात जीवित हानी झाली तर याची पूर्ण जबाबदारी ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी यांची राहील
तसेच संबंधित खान्देश युवक सुशिक्षित बेरोजगारांची स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित शिरपूर जिल्हा धुळे यांना दि. 1 जून 2021 पासून ठेका अदा करण्यात आला आहे. मागील चार महिन्यात संबंधित संस्था, ठेकेदाराने अद्याप पावेतो संपूर्ण मनुष्यबळ अथवा कर्मचारी नेमलेले नाहीत यामुळे संपूर्ण शहरात या कामाबाबत तक्रारी वाढत आहेत आणि नगरसेवकांना जनतेकडून जाब विचारण्यात येत आहे.
तरी मुख्यअधिकारी व नगराध्यक्ष यांना विनंती की संबंधित ठेकेदार, संस्था यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे व या ठेकेदाराची बिल अदा करू नये व संबंधित अधिकारी यांना याबाबत जाब विचारून माझ्या प्रभागातील काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा मी व माझे सहकारी नगरसेवक मुख्याधिकारी यांच्या दालनात उपोषणास बसू निवेदनावर रामानंद ठाकरे, योगेश पाडवी सुरेश पाडवी, सविता पाडवी, गौरव वाणी, महिला व बालकल्याण सभापती शोभा भोई, सुरेश पाडवी अमोन्नोदिन शेख यांच्या सह्या आहेत.