नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील रस्त्यांची डागडूजी होवून त्वरीत खड्डेमुक्त खांडबारा करण्यात यावे तसेच खांडबारा गावातील सर्व वार्डात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येवून डास, मलेरिया, डेंग्यू व विषाणूजन्य आजारांना अटकाव करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदेगट) उपजिल्हाप्रमुख राजेश गावीत यांनी केली आहे. तसे निवेदन खांडबारा ग्रा.प.सरपंच अविनाश गावीत, ग्रामसेवक आर.के.पाटील यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खांडबारा, ता. नवापूर हे सुमारे आठ हजार लोकसंख्येचे व मुख्य बाजारपेठेचे गाव आहे. विविध संस्था शाळा-कॉलेज, व्यापारी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमुळे वाहन व नागरिकांची सातत्याने वर्दळ येथे असते. रहदारी व वापरायोग्य मात्र गावाचे रस्ते दिसून येत नसून रस्त्यांत खड्डे पडलेले आहेत. कॉंक्रीटीकरण असलेल्या रस्त्यांच्या सळया व स्टील मटेरियल उघडे पडल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान पावसाळयामुळे पाणी साचून वाहनांना अपघात होवून चालक व नागरिकांना गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागू शकते.
खांडबारा गावातील खड्डेमय रस्त्यांमुळे किरकोळ अपघात,ृ अपघातांमुळे होणारे वाद; हे नियमित विषय होवून गेलेले आहेत. अशा किरकोळ वादांमुळे गावातील शांतता व सलोख्याचे वातावरणास तडा जात आहे. उक्त सर्व बाबीस खांडबारा गावातील मूलभूत सुविधा अर्थातच कॉंक्रीट रस्त्यांची झालेली दुरावस्था कारणीभूत आहे.
पावसाळयामुळे गावातील उमरीपाडा, बर्डीपाडा, डोंगरीला, लघुवेतन कर्मचारी सोसायटी, खाटीक गल्ली, गोसावी व शिंदे वस्ती, दलित वस्ती, बाजारपेठ, बसस्टँड परिसर, संत सेना चौक, संत संताजी जगनाडे चौक, रेल्वे कॉलनी, ग्रामपंचायत गल्ली, अनंत नगर, बटेसिंग नगर या एक ते पाच वार्डात डासांचे प्रमाण फार वाढलेले आहे. चिखलासह काही परिसरांत गटारी तुंबल्याने तसेच बर्डीपाडा व डोंगरीला भागात गटारी साफसफाई कामी पंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने घनकचरा व ओलाकचरा उघडयावर साचत असल्यानेही डासांची उत्पत्ती व दुर्गंधीचा उपद्रव वाढलेला आहे. हया सर्व बाबींमुळे गावातील जनतेला हिवताप, मलेरिया, डेंग्यू व विषाणूजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे.
दैनंदिन घनकचरा संकलन व नियमितपणे गटारींची साफसफाई याबाबतीत नेहमीच बर्डीपाडा भागाला दुय्यम व दुजाभावाची वागणूक दिलेली आहे. नियमित सार्वजनिक परिसर स्वच्छतेचा लाभ गावातील सर्वच नागरिकांना समान पातळीवर मिळाला पाहिजे. पंचायतीच्या सापत्नभावाच्या वागणूकीमुळे बर्डीपाडा भागात मलेरिया व हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे; ही बाब गंभीर व दुर्दैवी आहे. आरोग्यविषयक उपाययोजना तात्काळ न राबविल्यास रितसर पंचायत प्रशासनास जबाबदार धरत; शिवसेना पक्ष (शिंदेगट) खांडबारा, तर्फे आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश गावीत, खांडबारा शहर प्रमुख शैलेंद्रसिंह चौहान, युवा शहर प्रमुख संदीप नाईक, चंद्रशेखर सैंदाणे, राजेश नाईक, गणेश मोरे, सुरेश चव्हाण, कमलेश पानपाटील, दीपक वसावे, युसुफ खाटीक, अनिस खाटीक आदींच्या सह्या आहेत.








