नंदूरबार l प्रतिनिधी
येथील आदर्श मराठी विद्यामंदिरात राष्ट्रीय खेळाडू नारायणी मराठे हिचा सत्कार करण्यात आला.
ज्ञानतृष्णा, गौरव निष्ठा, सदाध्यायन, एकाग्रता, महत्त्वाकांक्षा ह्या पाच गोष्टी आत्मसात केल्या तर यश नक्कीच मिळते. जगातील सर्व गोष्टींची चोरी होऊ शकते पण तुमच्या ज्ञानाची व बुद्धीची चोरी कोणालाही करता येणार नाही. आणि याच ज्ञानाच्या व बुद्धीच्या जोरावर नुकत्याच कोलकाता येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतांना आदर्श मराठी विद्यामंदिरातील इयत्ता दुसरी ची विद्यार्थिनी कु. नारायणी उमेश मराठे हिने सुवर्ण पदक पटकाविले. तसेच जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्चित केले. या स्पर्धेत एकूण १२३ खेळाडू सहभागी झाले होते. त्यात तिने 9 पैकी ८.५ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविले. तिला सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पन्नास हजार रू. बक्षिस म्हणून मिळाले ही अतिशय कौतुकाची बाब आहे. आज शाळेत तिचा गुणगौरव व कौतुक सोहळा पार पडला. शाळेत येतानाच ढोल ताशांच्या गजरात व पुष्प वर्षाव करत तिचे स्वागत करण्यात आले. नारायणी, तिचे आई वडील व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी सार्वजनिक शिक्षण समिती चे सचिव डॉ. योगेश देसाई तसेच नारायणी चे आई, वडील व आजोबा, सौ. अश्विनी मराठे, उमेश मराठे व दिलीप मराठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. इतर मान्यवर म्हणून शाळेचे मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाणे, गुजराती विभागाचे मुख्याध्यापक भद्रेश त्रिवेदी व युवराज पाटील सर उपस्थित होते. संस्थेचे सचिव डॉ. योगेश देसाई यांनी तिचा सत्कार केला. मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाणे यांनी प्रास्ताविक सादर करतांना सांगितले की मागच्या वर्षी याच स्पर्धेत पराभूत झाल्यामुळे तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.परंतु जिद्दीने पुन्हा मेहनत करत तिने या वर्षी चमकदार कामगिरी केली व आता ती भारतीय संघाचे नेतृत्व करेल ही कौतुकाची बाब आहे.
नारायणी च्या आईने मनोगत व्यक्त करताना सांगितले की वयाच्या चौथ्या वर्षी बुद्धिबळाचे धडे गिरवायला सुरू केलेल्या लेकीने मागील तीन वर्षात खडतर प्रवास केला आहे. एवढ्या लहान वयात वेळेचे योग्य नियोजन करत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. चेअरमन ॲड. श्री. रमणभाई शाह यांनी नारायणी चे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सोनार यांनी केले तर आभार प्रदर्शन हरिष चौधरी यांनी केले.