नंदूरबार l प्रतिनिधी
सैताणे ( ता. नंदुरबार) येथील शेतकरी सुदाम गोपीचंद सोनवणे (वय ४९) यांनी कर्जबाजारी झाल्याने आपल्या शेतात २९ सप्टेंबर ला दुपारी तिनला शेतात गळफास घेऊन कायमची जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
सैताणे या गावाला दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे शनिमांडळ येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व इतर घेतलेले कर्ज दिवसेंदिवस वाढत असल्याने आलेल्या नैराश्यातून नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतात २९ सप्टेंबर दुपारी तीन च्या सुमारास शेतात गळफास घेऊन कायमची जीवनयात्रा संपवली.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथील सुदाम गोपीचंद सोनवणे (वय ४९) यांच्या परिवारात दोन मुले व दोन सुना व पत्नी, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. त्यांची बलवंड शिवारातील सुमारे आठ एकर शेती असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. यावर्षी शेतीच्या भांडवल साठी घेतलेले पीक कर्ज ,रात्रंदिवस शेतात मेहनत करत होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत असणारा दुष्काळ व यामुळे शेतात केलेला खर्चही निघेनास झाला. शिवाय सैताणे येथील अमरावती नदीला सुद्धा ह्या वर्षी एकदा सुद्धा पाणी आले नाही.दिवसेंदिवस कुटूंबाचा गाडा चालविणे कठीण होत होते.
दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असल्याने व शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने सुदाम सोनवणे यांना नैराश्य आल्याने त्यांनी २९ सप्टेंबर ला शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या परिवाराला शासन किती मदत करेल,अशी मदत न करता त्यांच्या कुटुंबाने तापी बुराई हा प्रकल्प लवकरात लवकर होऊन निदान दुसऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मयत शेतकरी तापी बुराई उपसा जलसीचन योजने लवकरात लवकर व्हावी यासाठी रनाळे येथे रास्ता रोको साठी सुध्दा हजर होते. एकूणच नंदुरबार तालुक्यातील अश्या बऱ्याच शेतकरी आत्महत्या या पूर्व पट्यात च का असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना तापी बुराई योजनेला गती देऊन शेतकरी माय बाप चा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा असा संतप्त शेतकरी कडून प्रश्न निर्माण होत आहे.








