नंदूरबार l प्रतिनिधी
राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाने आश्वासन देऊन ही पूर्ण न केल्याने महात्मा गांधीजी जयंतीच्या दिवशी समजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास करण्यात येणार आहे.याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,महाराणा प्रतापसिंहजी महासंमेलन-2023,संभाजीनगर येथे 25 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत राजपूत भामटा/परदेशी भामटा जातीस जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुरळीतपणे देण्यात यावे, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती राज्यात 9 मे रोजीच जन्मतारखेनुसार साजरी करण्यात यावी व या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी.
समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय/निमशासकीय वस्तीगृहे स्थापन करण्यात यावीत.राष्ट्रहितार्थ वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या महान कार्याचा प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा.भारत सरकारने घुमंतू व अर्ध घुमंतू भटक्या/विमुक्त जनजातीच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या ‘बाळकृष्ण रेनके व दादा विधाते आयोग’ यांनी सादर केलेल्या अहवालातील शिफारशी त्वरित लागू करण्यात याव्यात.विमुक्तजाती/भटक्याजमाती व इतर मागास प्रवर्गांची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.राजपूत भामटा/परदेशी भामटा जाती समूह वास्तव्य करत असलेल्या वाडी वस्तींवर सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
भारत सरकारने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक सैनिकी विद्यालय सुरू करण्यात यावे.
अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीप्रमाणे विमुक्त जाती/भटक्या जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देण्यात यावी.
राजपूत भामटा/परदेशी भामटा जातीतील महिला बचत गटांना उद्योगासाठी विशेष आर्थिक सहाय्य निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना.तसेच संशोधकास शासनाकडून आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती देण्यात यावी.
सशस्त्र बलांमध्ये भरतीसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालू करावे. समाजाच्या न्याय्य मागन्यांसाठी व जनहितार्थ केलेल्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात याव्यात या साठी
महासंमेलनामध्ये मागण्या पूर्णते संदर्भात समाजाला आश्वासित करण्यात आले होते.परंतु आजतागायत सदर मागण्यासंदर्भात शासनाकडून कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नाही व समाजाच्या तोंडाला केवळ पाने पुसण्यात आली आहेत.त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय व सनदशीर मार्गाने उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय समाजाला दिसत नाही.तरी 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधीजी जयंतीच्या दिवसी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपूत समाज बांधव लाक्षणिक उपोषण सुरू करीत आहोत.
तरी उपोषणास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.या वेळी राजेंद्र सिंह (श्याम) राजपूत, जितेंद्र सिंग राजपूत, मोहित राजपूत,चेतन राजपूत, संजय राजपूत ,भरतसिंह राजपूत, पृथ्वीराज राजपूत, सुनील राजपूत, राकेश राजपूत,प्रदीप राजपूत, शहादा तळोदा नंदुरबार येथील समाज बांधव उपस्थित होते.








