नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळेचे होणारे खाजगीकरण थांबवून शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे, याच प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दि.2 ऑक्टोंबर 2023 रोजी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चे काढण्यात येणार आहे.
त्याचा एक भाग म्हणून नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.2 ऑक्टोंबर 2023 रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सतिष पाटील यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस पत्रक देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, शासनाकडुन जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकांच्या शाळा विविध कंपन्यांना दत्तक देऊन भविष्यात त्या शाळा त्या कंपनीच्या मालकीच्या करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिक्षण मिळणे अवघड होणार आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामे लावून त्यांना त्यांच्यामुळे अध्यापनाच्या कामापासून दूर ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून पुन्हा गुणवत्तेबाबत ओरड केली जात आहे.
ग्रामीण व शहरी भागातील सरकारी शाळेतील शिक्षकांना निवडणुक मतदार नोंदणी, जनगणना यासह मतदान जागृती, शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण, निरक्षर सर्वेक्षण वेगवेगळ्या अँपमध्ये माहीती भरणे, व्हाट्सअपच्या माध्यमातून दररोज पुन्हा तीच ती माहीती मागवणे, दररोज शालेय पोषण आहारांच्या नोंदी ठेवणे यासह 75 पेक्षा जास्त अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक त्रासून गेले आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनावर प्रतिकुल परिणाम होत आहे. या सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे व पुर्ण वेळ अध्यापन करु द्यावे.
तसेच कंपन्यांमार्फत कंत्राटी नोकरभरती करु नये, या मागण्यांसाठी दि.2 ऑक्टोंबर 2023 रोजी संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर आक्रोश मोर्चे काढून असंतोष व्यक्त करण्यात येणार आहे. यापूर्वी 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी राज्यभरातील सर्व शिक्षकांनी शाळेत काळ्या फिती लावून कामकाज करीत निषेध नोंदविला होता. तरी पण शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे दि.2 ऑक्टोंबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंती दिवशी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने घेतला आहे. राज्यभरातील शिक्षकांसह पालकांनी, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षक संघटनांनी या आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सतिष पाटील, जिल्हा नेते हंसराज पाटील,
वसंतराव पाटील, संजय बागुल, लोटन कणखर, संजय पाटील, राज्य उपाध्यक्ष किशोर पाटील, राज्य सहसचिव प्रविण देवरे, जिल्हा कोषाध्यक्ष संजय घरमोडे, कार्यकारी अध्यक्ष आनंदराव करनकाळ, कार्याध्यक्ष संजय बाविस्कर, जिल्हा सरचिटणीस अमोल शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्वला बेडसे, सरचिटणीस कविता जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विवेक विसपुते, राजेंद्र पाटील, मनोज पवार, जिल्हा संघाचे पदाधिकारी उल्हास लांडगे, रोहिदास वाघ, शशिकांत पाटील, गुलाब पाटील, प्रमोद बागले, वासूदेव पाटील, गुलाब चौधरी, धर्मराज बागुल, नरेंद्र पाटील, रावसाहेब पाटील, वसंत सुर्यवंशी, अशोक भदाणे, नारायण नांद्रे, विजय पराडके, गोविंद सोनवणे, जितेंद्र बोरसे, केदार जाधव, प्रभाकर ठाकरे, राजेंद्र बोरसे, नारायण नांद्रे, प्रशांत भामरे, कांतीलाल राऊत, जीवन कोकणी, सायसिंग पाडवी, रघुनाथ बोरसे, नितीन पाटील, रविंद्र पवार, अशोक पवार आदींनी केले आहे.








