नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्र.752 जी, विसरवाडी – काळंबा-नंदुरबार- कोळदे – शहादा ते खेतिया सह विसरवाडी-काळंबा-नंदुरबार ते कोळदा या महामार्गाचे भूमिपुजन केंद्रीय मंत्री रस्ते वाहतुक नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्षापूर्वी करुनही अद्याप प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसल्याने कामाचे काम सुरू करण्याची मागणी मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.752 जी, विसरवाडी – काळंबा-नंदुरबार- कोळदे-शहादा ते खेतिया हा रस्ता महामार्ग म्हणून घोषीत झालेला आहे. या महामार्गाचे यापूर्वीच कोळदा ते खेतिया रस्त्याचे कॉक्रीटीकरण चे काम पूर्ण झालेले आहे. सदरील महामार्गाचे विसरवाडी-काळंबा-नंदुरबार ते कोळदे पर्यंतचे काम हे अजुन पर्यंत सुरु झालेले नाही. सदरील महामार्गावरील वाहतुकीची समस्या बघता वरील राहीलेल्या विसरवाडी- काळंबा – नंदुरबार ते कोळदे पर्यंतचा रस्त्याचे काम त्वरीत सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे. धुळे येथे 22 एप्रिल, 2022 रोजीच्या कार्यक्रमात या रस्त्यांचे भूमिपुजन तुम्ही केले असुन सुध्दा अद्याप या मार्गाचा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
तसेच नंदुरबार शहराला 20 ते 25 वर्षापूर्वी एका वळण रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती.परंतु त्याच वळण रस्त्याचे रुपांतर आज राष्ट्रीय महामार्ग नं. 753 बी यांच्यात झालेले आहे. महाराष्ट्र – गुजरात मध्यप्रदेशात जाणारी वाहतुक ही प्रामुख्याने नंदुरबार शहरातील याच वळण रस्त्यावरुन जाते.शहरातुन जाणाऱ्या याच रस्त्यावर अपघात सुध्दा मोठया प्रमाणावर होत असतात आणि म्हणून या वळण रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे व रस्त्याचा मध्ये दुभाजक व स्ट्रीट लाईट लावावेत अशी नंदुरबार शहरातील जनतेची मागणी नंदुरबार नगरपरिषदेकडे आहे.
परंतु हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 बी असल्याने तो आपल्या अखत्यारीत असुन 22 एप्रिल, 2022 च्या धुळे येथील कार्यक्रमात या मार्गाचे चौपदरीकरणाचा कामाची घोषणा करुन सुध्दा अद्यापपावेतो प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कामांना लवकर सुरुवात करावी अशी मागणी मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.








