नंदुरबार । प्रतिनिधी
शिरपूर शिवारातील सुळे शिवारातील
पिरपाणी फाट्यावर पोलिसांनी गांजाच्या बियाण्याची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला पकडले. त्याच्याकडून 52 हजारांचे सव्वा पाच किलो गांजाचे बियाणे जप्त करण्यात आले. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जिगर विनसिंग पावरा (वय 22 रा. चिलारे ता. शिरपूर) हा काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच 18 एई 1326) जात असतांना त्याला मुंबई-आग्रा महामार्गावरील सुळे गाव शिवारातील तेल्यादेवजवळ पिरपाणी फाट्यावर पकडण्यात आले. त्याच्याकडील लहान प्लॅस्टीकच्या गोणीची तपासणी केली असता त्यात गांजा सदृष्य अंमली पदार्थांचे 5 किलो 350 गॅ्रम वजनाचे बियाणे मिळून आले. एकूण 52 हजार रूपये किंमतीच्या बियाण्यांसह 20 हजारांची दुचाकी असा एकुण 72 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात पोकाँ शामसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र वानखेडे हे करीत आहेत.