नंदुरबार l प्रतिनिधी
येत्या 2 आणि 3 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण देशातील नागरी सहकारी पतसंस्थांचे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या पोस्टरचे प्रकाशन सहकार भारतीचे उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग प्रमुख दिलीप लोहार (शिरपूर) यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील पेन्शनर भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम सहकार भारतीचे संस्थापक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी दिलीप लोहार यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्यासह देशातील सहकार क्षेत्राचा महत्त्वाचा कणा म्हणजे सहकारी पतसंस्था आहेत.बिना संस्कार नाही सहकार या घोषवाक्य प्रमाणे सहकार भारतीने देशात संघटन उभारले आहे.आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बाजू असलेल्या सहकारी पतसंस्थांच्या विविध समस्या आणि अडचणी यावर मंथन करण्यासाठी सहकार भारतीने दि. 2आणि 3 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे.या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील विविध सहकारी नागरी पतसंस्थांचे कर्मचारी आणि संचालक सहभागी होणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्यातर्फे अधिवेशनाचे निमंत्रण असुन नंदुरबार – धुळे जिल्ह्यातून पतसंस्था प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दिलीप लोहार यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवी दिल्ली येथील क्रेडिट सोसायटी राष्ट्रीय अधिवेशनाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक यांनी प्रास्ताविकातून आढावा मांडला.तर नंदुरबार सहकार भारतीचे जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी आभार मानले. याप्रसंगी जिल्हा सचिव के.डी. गिरासे, शिरपूर येथील शशीकांत चौधरी तसेच नंदुरबार सहकार भारतीचे पदाधिकारी रोहिदास सौपुरे, सुधाकर धामणे, पांडुरंग माळी, योगेश तांबोळी, प्रल्हाद भावसार, रवींद्रसिंग राठोड, बी.डी. गोसावी, सुनिल साळी आदी उपस्थित होते.