नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाला टाकरखेडा गावाच्या दिशेने काल दुपारी मध्यभागीच भगदाड पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाची धावपळ उडाली आहे.तापी नदीवरील सारंगखेडा पुल बंद केला असून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिला.
सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीच्या पुलावरून आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक मोठे अवजड वाहन जात असताना त्या वाहनाचा टायर पुलावरील एका खड्ड्यात रुतल्याने टाकरखेडा गावाचा दिशेने पुलाला मोठे भगदाड पडले. यावेळी सुदैवाने वाहनाला १६ चाके असल्याने वाहन तिथून निघाले. परंतु ग्रामस्थ व नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट येताच पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन व इतर विभागाला माहिती कळविल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परंतु घटनेला तब्बल दोन तास होऊनही कोणीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढील अनर्थ टाळण्यासाठी पुलावरील वाहतूक रोखली. दरम्यान, तापी नदीला पूर आल्याने अथांग पाणी वाहत आहे. त्यातच पुलावर भगदाड पडले. पोलिसांना माहिती दिल्यावर देखील पोलीस यंत्रणा तात्काळ पोहचली.
टाकरखेडा येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक थांबवली. सारंगखेडा व टाकरखेड्याचा दिशेने पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी व मोटरसायकल स्वारांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून बरेजच्या छोट्या पुलावरून तात्पुरती वाहतूक सुरू केली आहे.
दरम्यान दोंडाईचा अनरदबारी हा रस्ता बंद करण्यात आला असून गुजरातकडून धुळयाकडे जाणारी वाहने अक्कलकुवा कुकरमुंडा-नंदुरबार धुळे, गुजरातकडून धुळयाकडे जाणारी वाहने अक्कलकुवा तळोदा नंदुरबार धुळे, गुजरातकडून धुळयाकडे जाणारी वाहने अक्कलकुवा तळोदा प्रकाशा-नंदुरबार- धुळे, गुजरातकडून जळगांवकडे जाणारी वाहने अक्कलकुवा तळोदा शहादा -शिरपूर जळगांव वाहतूक वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली.








