नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात ईद-ए-मिलाद गणेश विसर्जनानंतर साजरा करण्याचा मुस्लिम बांधवांनी स्तुत्य निर्णय घेतला आहे.
19 ते 28 सप्टेंबर 2023 दरम्यान गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी अंनत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे दोन्ही महत्त्वाचे सण एकाच दिवशी येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण उत्साहात साजरे करुन मोठ्या संख्येने मिरवणुका काढण्यात येत असतात.
जिल्ह्यातील काही ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग व ईद-ए-मिलाद मिरवणूकीचा मार्ग हा सारखा आहे. त्यामुळे 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या दिवशी ईद-ए-मिलाद सणानिमित्त मिरवणूक न काढता 1 ऑक्टोंबर रोजी मिरणूक काढण्याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मुस्लीम समाजातील धर्मगुरु व प्रतिष्ठित नागरिक यांना आवाहन केले होते. जिल्हा पोलीस दलाच्या आवानास सकारात्मक प्रतिसाद देत, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या दिवशी ईद-ए-मिलाद सणानिमित्त मिरवणूक न काढण्याचा निर्णय जिल्ह्यातील सिरत कमिटीने जाहिर केला आहे.
नंदुरबार शहरात 1 ऑक्टोंबर रोजी, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत सप्टेंबर रोजी, शहादा पोलीस ठाणे व तळोदा पोलीस ठाणे हद्दीत 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणूक काढूण साजरा करणार असल्याचे जाहिर केले आहे. तसेच नवापूर व अक्कलकुवा तालुक्यात ईद-ए-मिलाद मिरवणुकींचे आयोजन नाही.
सण / उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारी म्हणून विविध उपायोजना करण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, गर्दीचे ठिकाण व इतर महत्वाच्या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात येणार आहे.
सण / उत्सवादरम्यान शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे काही समाज कंटकांकडून अनुचीत प्रकार होणार नाहीत यासाठी अशा इसमांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे तसेच काही अनूचीत प्रकार आढळून आल्यास त्यांचेविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद बंदोबस्तासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस अधिकारी व अंमलदाराचा बंदोबस्त संपूर्ण पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आलेला आहे.








