नंदुरबार l प्रतिनिधी
विधानसभेचे २०० प्लस आणि लोकसभेचे ४५ प्लस हे आपले २०२४चे लक्ष ठरलेले असून ते साध्य करण्यासाठी आपण पक्षकार्याला वाहून घ्या. विश्वमित्र नरेंद्र मोदी आणि कुशल नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा सत्ता आणण्यासाठी आपण समर्पित भावाने काम करा. आपण सर्वांनी संघटीत राहून काम केले तर निश्चितच स्वप्नपूर्ती होईल, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा महामंत्री विजय चौधरी यांनी भारतीय जनता पाटीच्या जिल्हापरिषद सदस्यांच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय भाषणात केले.
पालघर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव आदिवासी बहुल जिल्ह्यातून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्यांसाठी दिनांक १३ आणि १४ सप्टेंबर २०२३ असे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. ६ सत्रांमधे पार पडलेल्या या शिबिराचा आज दुपारी समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, खा.उन्मेश पाटील, आ जयकुमार रावल, प्रदेश कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, लोकसभा निवडणुक प्रमुख तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील व अन्य उपस्थित होते. पालघर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या आदिवासी बहुल जिल्ह्यातून अपेक्षीत असलेल्या ७० पैकी ६० हून अधिक सदस्य जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित होते.
जिल्हापरिषद सदस्य हे खरे ग्रामीण विकासाचे शिलेदार असतात. त्यांना अधिक लोकाभिमुख करायला आणि संघटीत ठेवायला भाजपाने आयोजित केलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास याप्रसंगी विजयभाऊ चौधरी यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या दीर्घ सत्ताकाळात क्रांतिकारी बिरसा मुंडासारख्या अनेक देशप्रेमी लढवैय्यांचा इतिहास दाबला गेला. पण मोदी सरकारने खऱ्या अर्थाने बिरसा मुंडांसारख्या देशभक्तांचा इतिहास देशासमोर मांडून त्यांचा गौरव करणारा न्याय दिला.
आदिवासी उत्थानाच्या अनेक योजना भाजपा सरकारने दिल्या आणि आदिवासींना खऱ्या विकासप्रवाहात आणले. भाजपातून निवडून येणारे अनेकजण यावर लोकांमधे जाऊन बोलत नाहीत. कोरोना काळात महाराष्ट्राची जनता मृत्यूच्या दारात असतांना उध्दव ठाकरे हे घरात होते. त्याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्या काळी महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी घरोघर पोहचून सहकार्य करण्यात मग्न होती.
बलिदानाच्या तयारीत राहून झोकून काम करण्याच्या मानसिकतेमुळे आणि जनमानसाशी नाते जोडणाऱ्या तसल्या कार्यपध्दतीमुळेच सर्वाधिक आमदार, सर्वाधिक खासदार, सर्वाधिक महापौर, सर्वाधिक नगरसेवक, सर्वाधिक ग्रामपंचायती, सर्वाधिक जिल्हापरिषद सदस्य असलेला एकमेव पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आज कणखरपणे उभी आहे. आपण प्रत्येकाने हा संदर्भ ठेवला पाहिजे, असेही विजय चौधरी म्हणाले. यावेळी सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष जीतेंद्र पाटील यांनी केले.








