नंदुरबार l प्रतिनिधी
उपक्रमाचे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत रविवारी पोलीस दलातर्फे ” पोलीस दादाहा सेतू “या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दल हे नेहमी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलीस व जनता संबंध वृध्द्तीगत व्हावे यासाठी देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दल नेहमीच प्रयत्नशिल असतात. नंदुरबार जिल्हा पोलीस दल हे जनतेसाठी ऑपरेशन अक्षता, अंमली पदार्थ मुक्त जिल्हा, पाणपोई, जनता दरबार, श्रमदान या सारखे नव-नवीन उपक्रम राबवितात. नंदुरबार जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे विविध सामाजिक कार्यक्रमात जातात, तेव्हा त्यांना अनेक सामान्य नागरिक भेटून त्यांच्या समस्या मांडत असतात. विविध शासकीय योजनांचे लाभ किंवा शासकीय योजनांची माहिती तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ” पोलीस दादाहा सेतू” हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असून त्याची सुरुवात प्रथम अक्कलकुवा पोलीस ठाणे येथून होणार आहे.
स्थानिक बोली भाषेत पोलीस दादाहा सेतू म्हणजे पोलीस दादाचा सेतू. या ठिकाणी नागरिकांचे शासकीय काम पोलीस दलामार्फत शासकीय कार्यालयात पोहचवून झालेली कामे, दाखले, प्रमाणपत्रे इत्यादी नागरिकांना परत मिळणार आहेत. म्हणजेच पोलीस दल हे नागरिक व शासकीय कार्यालये यामध्ये सेतू, पूलाची भूमिका पार पाडणार आहेत. या संकल्पनेतून या योजनेस पोलीस दादाहा सेतू असे नामकरण केले आहे.
नंदुरबार हा आदिवासी बहुल लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा, मोलगी, नवापूर, धडगांव, म्हसावद इत्यादी पोलीस ठाणे हद्दीत राहणारे नागरिक अतिदुर्गम भागात वास्तव्य करीत असतात. आदिवासी बांधवांना वेगवेगळ्या शासकीय, निमशासकीय कामांसाठी आवश्यक असणारे शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी विविध कार्यालयात जावे लागत असते. अशा वेळी तेथे गेल्यानंतर त्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे कुठे मिळतात ? कुणाकडे अर्ज करावा ? त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते ? किती दिवसात मिळतील ? त्याची प्रक्रिया काय ? याबाबत माहिती नसल्यामुळे किंवा अशिक्षितपणा / अज्ञानामुळे कागदपत्रे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. त्यामुळे त्यांची भविष्यातील कामे होत नाहीत किंवा रखडली जातात. या शासकीय कामासाठी एजन्टकडून फी घेतली जाते व अशी फी आदिवासी बांधवांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तसेच गाव खेड्यावरून शेतीची कामे सोडून शासकीय कार्यालयात ये-जा करण्यामुळे वेळ व पैसा यांचा अपव्यय होतो.
या सर्व बाबींचा विचार करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस दादाहा सेतू हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये आदिवासी बांधवांच्या पैशांची बचत व वेळेचा होणारा अपव्यय वाचणार आहे. तसेच सर्व कामे विनामुल्य होणार आहेत. पोलीस दादाहा सेतू या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.त्या कक्षामार्फत संबंधीतांना योग्य ते सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येईल.
पोलीस व जनता या दोघांमध्ये योग्य समन्वय ठेवणे, तसेच आदिवासी बांधवांना आवश्यक असणारे कागदपत्र, प्रमाणपत्रे काढणे तसेच ते कागदपत्र काढण्यासाठी मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे ” पोलीस दादाहा सेतू ” हा समाजोपयोगी उपक्रमाचे उद्घाटन 10 रोजी सकाळी 12 वाजता अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शप्रमोदकुमार पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
आदिवासी बांधवांना आवश्यक असणारे कागदपत्र, प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत व मार्गदर्शन तसेच नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती ही एकाच ठिकाणी मिळावी हा मुख्य उद्देश या उपक्रमाचा आहे.
अक्कलकुवा तालुका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना 10 स्पटेंबर रोजी सकाळी 12 वाजता अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या आवारात ” पोलीस दादाहा सेतू ” या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तरी अक्कलकुवा तालुका हद्दीतील नागरिकांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.








