नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा- २ अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी गावे हागणदारीमुक्त अधिक ( मॉडेल )केली जात आहेत. जी गावे मॉडेल झाली आहेत अशा गावातील स्वच्छतेची शाश्वतता राहावी यासाठी जिल्ह्यात दि .३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दृष्यमान स्वच्छतेसाठी कुटुंब भेटी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी दिली आहे .
नंदुरबार जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रम सुरू आहेत . त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे कामे घेण्याचे नियोजन असून काही गावांमधे ही कामे पूर्ण झाल्याने ही गावे मॉडेल घोषित करण्यात आली आहेत .
दिनांक ३१ ऑगष्ट २०२३ पर्यंत जिल्हयातील हागणदारी मुक्त अधिक ( मॉडेल) झालेल्या गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. सदर कुटुंब भेटी अभियान हे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी , आशावर्कर, ग्रामरोजगार सेवक, सिआरसी यांच्या मार्फत राबविले जाणार असून गृहभेटी दरम्यान कुटुंबांना विचारण्याची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन याविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत .