नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यातील तरुण, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न व समस्या सुटावी, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष महायुती सत्तेत सहभागी झाला आहे.आगामी कालावधीत तरुणांना रोजगार देण्यासाठी संपूर्ण राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले.
शहाद्यातील अन्नपूर्णा लॉन्स येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा(अजित पवार गट)जिल्हा मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील युवकाच्या हाताला काम मिळावे, राज्यातील दुष्काळ दूर करता यावा, दुष्काळग्रस्तांना मदत करता यावी,यासाठी ना.अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. रोजगार नसल्याने तरुण स्थलांतर करत आहेत.तरुणांना स्थानिक परिसरात रोजगार मिळावा यासाठी पक्षातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर सर्वच समाजातील नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले आहे.सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
नोकरी महोत्सवाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पहिला मेळावा नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात येणार असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले. जि.प.सदस्य मोहन शेवाळे म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार, खासदार नसतांना जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करीत आहोत.प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका डॉ.मोरे यांची असते. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारा पक्ष म्हणून ओळखला जातो.
जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे म्हणाले, मुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना एकमुखी पाठिंबा दिला. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.आदिवासी जिल्हा असल्याने येथे अनेक समस्या आहेत.या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी छोटू कुवर, नंदुरबार येथील मोहन माळी, ॲड.रुपसिंग वळवी, सिमा सोनगिरे, रविंद्र वळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात जिल्ह्यातील महिला व पुरुषांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.प्रास्ताविक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी केले.सुत्रससंचलन विष्णू जोंधळे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.जितेंद्र भंडारी, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष अल्का जोंधळे, महिला तालुकाध्यक्ष मंजुळा मुसभदे, प्रतिभा कुलकर्णी मेळाव्यास पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








