नंदुरबार l प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांपैकी अनेकजण आपली समस्या योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी मांडू शकत नाहीत,
ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आज (७ सप्टेंबर ) पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते व दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली होणारे ‘दिव्यांगांच्या दारी’ जिल्हास्तरीय अभियान सर्वांच्या समन्वयातून व सुक्ष्म नियोजनातून संस्मरणीय करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
त्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक के.डी. सातपुते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व विविध यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या, दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण जिल्हास्तरावर येऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानच अशा दिव्यांग बांधवांच्या दारी जाणार असल्याने या अभियानातून खऱ्या अर्थाने दिव्यांगांची सेवा होऊ शकते. जिल्हा स्तरावरील शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी त्यांचा निपटारा अभियानात करणार आहेत.
दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (आधार कार्ड) अत्यावश्यक आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील आधार कार्ड धारक दिव्यांगांची संख्या अल्पशी आहे. हे वैश्विक ओळखपत्र (आधार कार्ड) नसल्याने दिव्यांगाना अनेक योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागते. दिव्यांगांच्या विविध योजनांबाबत जिल्हास्तरावर विविध समित्या कार्यरत आहेत. या कार्यक्रमास जिल्हा प्रशासनाने गती देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे या दिव्यांग कल्याण अभियानाच्या मेळाव्यातून त्यास अधिक गती देण्याचे नियोजन करावे.
यावेळी त्या म्हणाल्या, गुरूवार, ७ सप्टेंबर २०२३ रोजी नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे सकाळी १० वाजता होणाऱ्या या अभियानात दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व प्रकारची प्रमाणपत्रे, दिव्यांगत्वाचे आधार प्रमाणपत्र, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक ती प्रमाणपत्रे वितरीत करण्याची कार्यवाही करावी. या कामात जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणा, अधिकारी तसेच दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध अशासकीय संस्था यांनाही आमंत्रित करण्यात यावे. दिव्यांगांच्या शासनाशी निगडीत व उपलब्ध योजनांमधील विविध अडचणी बाबत या शिबीरामध्ये कार्यवाही करण्यात यावी. या अभियानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दिव्यांगांना आवश्यक असणारे सर्व प्रमाणपत्रे त्यांना शिबीरामध्येच प्रदान करण्यात यावीत. त्यासाठी आरोग्य विभागाच्या समन्वयाने सध्या असलेल्या यंत्रणेबरोबरच आवश्यक ती तात्पुरती यंत्रणा सुद्धा उभारण्यात यावी. या अभियानाच्या दिवशी दिव्यांगांना ने-आण करण्याची मोफत व्यवस्था करण्यात यावी. कार्यक्रमात दिव्यांगांचे जमिन, जात प्रमाणपत्रे, विविध योजनांची नोंदणी प्रमाणपत्रे व तत्सम शासकीय कामांची पूर्तता करण्यात यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यावेळी दिले आहेत.

मान्यवरांची उपस्थिती
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार असून, मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू हे असतील. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार सर्वश्री अमरीश पटेल, किशोर दराडे, आमशा पाडवी, सत्यजीत तांबे, अॅड. के.सी.पाडवी, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिव्यांग बांधवांसाठी मोफत बस सेवा
कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी तालुकास्तरावरुन दिव्यांग बांधवाना ने-आण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मार्फत मोफत प्रवासासाठी बसेसचे सोय करण्यात आली असून त्यांचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत.
शहादा आगार ची बस धडगांव मार्गे असली-जमाना- तलई- चुलवड मार्गे नंदुरबारला येईल.
अक्कलकुवा आगाराची बस मोलगी येथुन अक्कलकुवा-वाण्याविहिर- निझर मार्गे नंदुरबारला येईल.
शहादा आगाराची बस शहाद्याहुन सारंगखेडा- निमगुळ मार्गे- मांजरे- कोपर्ली-भालेर-उमर्दे मार्गे नंदुरबारला येईल.
नंदुरबार आगाराची बस धानोराहुन लोय-पिंपळोद- करणखेडा-सुंदर्दे मार्गे नंदुरबारला येईल.
नवापुर आगाराची बस नवापुर बस स्थानकातुन – चिंचपाडा-विसरवाडी-खांतगाव-खांडबारा- भादवड- ढेकवद मार्गे नंदुरबारला येईल.
अक्कलकुवा आगाराची बस शेजवा पुर्नवसन- बोरद-तळवे- आमलाड-तळोदा-हातोडा ब्रिजमार्गे नंदुरबारला येईल.
नंदुरबार बस स्थानकापासुन श्री छत्रपती शिवाजी नाट्यगृह (नंदुरबार) पर्यंत स्वतंत्र बस व्यवस्था करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवानी येथे श्री छत्रपती शिवाजी नाटयगृह (नंदुरबार) येथे दिव्यांग कल्याण विभागामार्फत आयोजित दिव्यांगांच्या दारी अभियान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन, समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी यावेळी केले.








