नंदुरबार l प्रतिनिधी
कांद्याचे दर वाढल्यानंतर सरकारने निर्यात बंद केली. तसेच कापसाला चांगले दर मिळाले तर ऑस्ट्रेलियातून कापसाची आयात केली. यातून शेतमालाचे दर घसरले. यामुळे केंद्र सरकार हे शेतकरी, कष्टकरी विरोधी सरकार असल्याचा घणाघात आ.रोहित पवार यांनी केला आहे. नंदुरबार येथे आयोजित राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी आ.पवार बोलत होते.
यापुढे श्री.पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर मिळू नये, यासाठी भाजपा सरकार प्रयत्न करत आहे. खरे तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असून सातत्याने याबाबतचे प्रश्न मांडले जातात. मात्र, सरकार याची दखल घ्यायला तयार नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. महिनाभरापासून पाऊस नाही. असे असतांना नंदुरबार जिल्ह्याला दुष्काळी घोषीत करुन तात्काळ शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मदत करणे अपेक्षित होते. मात्र याबाबतचा निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही.
यामुळे येत्या पाच दिवसात शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही आ.पवार यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने आदिवासी हिताच्या सर्व योजना बंद केल्या. खावटी अनुदान बंद केले. आदिवासींच्या जमिनी कोणीही विकत घेऊ शकत नाही असा कायदा असतांना सदरचा कायदा मोडीत काढून आदिवासींच्या जमिनींवर कारखानदारी उभी करुन त्यांना जमिनीपासून वंचित करण्याचे कारस्थान भाजपाचे असल्याचा आरोपही आ.पवार यांनी केला. शरद पवार मुख्यमंत्री असतांना ९ टक्के निधी आदिवासींसाठी आरक्षित ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारच्या काळातच आदिवासींचा खरा विकास झाल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भाजपा नेहमी धर्माचे राजकारण करत असून समाजात वाद निर्माण केले जातात. मणिपूरच्या घटनेवर एकही भाजपा नेता बोलायला तयार नाही. भाजपाचे नेते आदिवासींना वनवासी म्हणतात. आदिवासींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न भाजपा सरकारकडून होत असल्याचा आरोपही आ.पवार यांनी केला. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावर निर्णय होवू शकला नाही हे भाजपा सरकारचे मोठे अपयश असल्याचा आरोपही आ.पवार यांनी केला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ.उदेसिंग पाडवी यांनी आदिवासी समाजाचा विकास अद्यापही झाला नसून विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली. आ.सुनिल भुसारा यांनी येत्या काळामध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी नितीन जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी आ.जयदेव गायकवाड, माजी आ.विद्या चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्यासह सुनिल गव्हाणे, राज राजापूरकर, मोहसीन शेख, कविता मेहत्रे, नावीद उलजमा, पंकज मोहोळ, अनिता परदेशी, दानेश पठाण, मंजुळा पाडवी, हितेंद्र क्षत्रिय, संदिप परदेशी, पुरुषोत्तम चव्हाण, जिल्हा युवाध्यक्ष नितीन जगताप , बिपीन पाटील, केसरसिंग क्षत्रिय, डॉ.रामराव आघाडे, प्रल्हाद मराठे, आरिफ नुरा, योगेश मराठे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन विजय चव्हाण यांनी केले.








