नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील डनेलचा सुरवाणीपाडा येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्याच घरात पतीवर कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना घडली.याप्रकरणी मोलगी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील सुरवाणीपाडा येथील नरपतसिंग नोबल्या पाडवी (वय ३८) यांना पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे समजले. यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी वाद निर्माण होत होता. दरम्यान, नरपतसिंग पाडवी यांच्या पत्नीने प्रियकर सिपा नानजी पाडवी याच्या मदतीने नरपतसिंग पाडवी यांच्यावर कुऱ्हाडीने वार करुन ठार केले.
याप्रकरणी तेजला नोबल्या पाडवी यांच्या फिर्यादीवरुन संशयित सिपा नानजी पाडवी व मयताच्या पत्नीविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत.