नंदुरबार प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील पांघराण गावात एका केंद्रावर दुधाचे संकलन होत नसतांनाही मोठ्या प्रमाणावर या केंद्रातुन दुधाचा बाहेरगावी पुरवठा होत आहे. दुधाचे संकलन होत नसतांनाही या ठिकाणी दुधाची बोअरींग आहे की काय? असा सवाल जि.प.च्या स्थायीसभेत सदस्यांनी केला.
नंदुरबार जि.प.ची सभा अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालकल्याण सभापती सौ.संगिता भरत गावित, सभापती गणेश पराडके, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेच्या सुरवातीला जि.प.सदस्य भरत गावित यांनी मागच्या बैठकीत जलजीवन मिशनची कामे काही ठिकाणी सुरु झाली नाही. म्हणुन संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशी मागणी केली होती. त्यावर जि.प.सदस्य भरत गावित यांनी ठेकेदारांवर काय कारवाई केली ?
याबाबत विचारले असता मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी सबंधित ठेकेदारांना काम सुरु करण्यासाठी 31 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली असुन त्यानंतर कामे सुरु न झाल्यास संबंधित ठेकेदारांची वर्कऑर्डर रद्द करण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, नवापुर तालुक्यात शेतकर्यांना युरिया खत भेटत नसुन त्यांना गुजरात राज्यातुन खत आणावे लागत असल्याची तक्रार जि.प.सदस्य राया मावची यांनी केली. नवापुर तालुक्यातील दुकानदारांकडुन खत खरेदी करावयाचे असल्याचे मिश्र खत घेण्याची सक्ती दुकानदारांकडुन करण्यात येत असल्याने शेतकर्यांची आर्थिक लुट केली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. दरम्यान शेतकर्याने युरिया सोबत मिश्र खत घेतले नाही म्हणुन उलट सबंधिताने शेतकर्यावरच पोलीस कारवाई केली.
नंदुरबार जि.प.ने संबंधित खत दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी जि.प.सदस्य भरत गावित यांनी केली. दरम्यान, पांघराण येथे एका संस्थेकडुन दुध संकलन होत नाही तरी टॅकर भरुन दुध बाहेर पाठविले जाते असे सांगत जि.प.सदस्य राया मावची यांनी याठिकाणी दुधाची बोअरिंग तर नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी संबंधित दुध संकलन केंद्राची चौकशी करण्याचे आदेश दिले. नंदुरबार जिल्हा परिषदेत गेल्या 10 वर्षापासुन एकाच टेबलावर तेच कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे कर्मचार्यांचा मनमानी कारभार सुरु झाला आहे. अशा कर्मचार्यांची यादी तयार करुन त्यांची बदली करा अशी मागणी जि.प.सदस्य भरत गावित यांनी केली.