म्हसावद । प्रतिनिधी
म्हसावद अनकवाडे गावालगत एका महिन्यात सलग दुस-यांदा त्याच ठिकाणी केळीच्या शेतात मादी बिबट्या विजेचा शॉक लागून मृत झाल्याची घटना घडली आहे. कडूलिंबाच्या झाडावर चढताना मुख्य विद्यूत वाहीनीच्या तारेला स्पर्श झाल्याने बिबट्या मादी खाली पडून मृत झाली.मुख्य विद्यूत वाहीनीचे तार हे कडूलिंबाच्या फांद्यांमधून गेले आहेत.
या बाबत वृत्त असे की,अनकवाडा गावाजवळ शेतकरी ईश्वर मनीलाल पाटील,चंद्रकांत मणिलाल पाटील रा. अनकवाडे यांच्या सर्वे नंबर 5 क्षेत्रात केळीच्या शेताच्या बांधावर कडूलिंबाचे मोठे झाड आहे आहे.त्याच्यामधून मुख्य विद्युत वाहिनीचे तार गेलेले आहेत. बिबट्या कडुलिंबाच्या झाडावर चढत असताना विद्युत वाहिनीच्या शॉक लागून दोन दिवसापूर्वी जागेवरच मृत झालेला आहे.अंदाजे दोन वर्ष वयाची मादी असून दोन पिल्ले पाहील्याची माहीती उपस्थितांनी दिली.शॉक लागलेल्या ठिकाणी बिबट्याचे केसही चिकटल्याचे दिसत होते.
याबाबत राणीपूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल एम.बी.चव्हाण, वनपाल संजय पवार,वनरक्षक राधेश्याम वळवी,रेखा खैरनार,सत्तरसिंग वळवी यांनी उपस्थित राहून पंचनामा केला आहे.त्यांना वन्यजीव संस्था नंदुरबारचे अध्यक्ष सागर निकुंबे,हेमंत पवार,दिनेश पवार यांनी सहकार्य केले.बिबट्या मादीस राणीपूर येथे नेले असून संध्याकाळी अंत्यविधी करणार आहेत.पशुवैद्यकीय अधिकारी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन ,तालुका पशुवैद्यकीय लघू सर्व चिकीत्सालय शहादाचे डॉ.संजीत धामणकर उपस्थित होते.मात्र शॉक लागून दोन तीन दिवस घटनेला झाल्याने बिबट्याचे शरीर कुजलेल्या स्थितीत झाल्याने शवविच्छेदन करता आले नाही असे डॉ.धामणकर यांनी सांगीतले.
राणीपुर वनविभागाचे दुर्लक्ष
6 ऑगस्टला याच ठिकाणी शॉक लागून अडीच वर्षे वयाची मादी बिबट्या,आता दोन वर्षाची मादी बिबट्या शॉक लागून मृत झाली.कडूलिंबाची फांदी तोडून टाकावी अशी चर्चा 6 ऑगस्टला उपस्थित कर्मचारी वर्गात झाली होती.शिवाय दोन पिल्ले असल्याची चर्चाही होती. त्यावेळीच राणीपुर वनविभागाने कडूनिबांची फांदी तोडली असती किंवा पिंजरा लावला असता तर दुसरी घटना घडली नसती.याला राणीपुर वनविभागाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याची आज घटनास्थळी चर्चा सुरू होती.








