सारंगखेडा l प्रतिनिधी
सारंगखेडा येथील तापी नदीवरील असलेला पूल अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काल (दि. २८) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सारंगखेडा ते टाकरखेडा या दरम्यानच्या पुलाची अगोदरच असलेले खिळखीळी असलेली अवस्था अधिकच बिकट झाली आहे. टाकरखेडा भागातील सपोर्ट पिचिंग भरावच वाहून गेला असून आता हा पूल शेवटच्या घटका मोजत असल्याचे यातून चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान अनेक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही कुठलाही उपयोग झालेला नसल्याचे दिसून येते.
तापी नदीवरील सारंगखेडा ते टाकरखेडा दरम्यानच्या पुलाची अनेक वर्षापासून बिकट अवस्था झाली आहे. काल (ता. २८) रात्री या भागात अतिवृष्टी झाल्याने टाकरखेडा कडील पुलावरील सपोर्ट पिचिंग भराव वाहून गेला आहे. या भरावाचे पाच वर्षात दोन वेळा काम केले होते. यात लाखों रूपये खर्च करण्यात आला आहे. शासनाचे लाखों रूपये पाण्यात गेले असून हा पुल शेवटच्या घटका मोजत असल्याचे यातून चित्र निर्माण झाले आहे.
पुलाच्या टाकरखेडा कडील भराव वाहून गेल्याचे सकाळी लक्षात आल्यावर भराव खचल्याचा फोटो दिवसभर सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यावरून मनसेचे रस्ते आस्थापनाचे उपाध्यक्ष राकेश पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक, तहसीलदार यांना माहीती दिली. या विभागांनी सारंगखेडा पुलावर येऊन पाहणी केली.