नंदुरबार l प्रतिनिधी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नंदुरबार शहर कार्याध्यक्षपदी एजाज बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथे ओबीसींचा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात एजाज बागवान यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची दाखल घेवून त्यांची नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या हस्ते एजाज बागवान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र निरीक्षक नितीन शेलार, उत्तर महाराष्ट्र संघटक अनिल नळे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर माळी आदी उपस्थित होते. एजाज बागवान हे कॉंग्रेस सेवा दलाचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष, ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, अखिल भारतीय त्यौहार कमिटी नवीदिल्ली नंदुरबार जिल्हाध्यक्ष, नंदुरबार जिल्हा शांतता समिती सदस्य, नंदुरबार शहर व तालुका सीरत कमिटीचे सचिव, इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या विविध पदांवर ते कार्यरत आहेत. बागवान यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.