नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात 21 जुलै पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून यानिमित्त मतदारांनी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराच्या घरी 21 जुलै ते 20 ऑगस्ट 2023 या संपूर्ण महिनाभराच्या काळात भेटी देतील. आपल्या या भेटींमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील, तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करणार आहेत. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसेच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे काम ही या काळात केलं जाणार असल्याचे मनीषा खत्री यांनी सांगितले आहे.
या उपक्रमामुळे राज्यातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होणार आहे. तसेच हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांना मोठी संधी आहे, असे मनीषा खत्री यांनी म्हटले आहे. त्यामुळेच जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपलं स्वतःचं तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावं, ज्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशा व्यक्तिंची मतदार नोंदणी करून घ्यावी. मतदार यादीतील आपला वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरूस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत, लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावं बदलून घ्यावीत, स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी, असे ही आवाहन मनीषा खत्री यांनी केलं आहे.
मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्यानं, सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असे आवाहनही मनीषा खत्री यांनी केलं आहे.








