नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत महामार्गावरील उचीशेवडी फाट्याजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नवापूर तालुक्यातील बोदवड येथील जमसू सोना गावित हे दुचाकीने धुळे-सुरत महामार्गाने जात होते. यावेळी एका ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. टी.एन. ५२ एए ३९१५) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून उचीशेवडी गावाच्या फाट्याजवळ दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात जमसू गावित यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
तसेेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत कैलास जमसू गावित यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. किरण वळवी करीत आहेत.








