म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवीन शिक्षक भरती ऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. याकरिता महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी लेखी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू, प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विकास घुगे यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिक्षकांच्या नियुक्तीबाबत राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. ७० वर्षीय पेन्शनधारक निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पध्दतीने जिल्हा परिषद शाळेत नियुक्तीचे आदेश काढले आहेत. राज्यात ५५ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असताना त्या ठिकाणी बेरोजगारांना संधी न देता हा निर्णय घेतल्याने शिक्षक संघटना व डी. एड, बी. एड. धारकांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात कहर म्हणजे शिक्षकांची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे ठेवण्यात आली आहे. राज्यातील शिक्षक भरतीवर राज्य सरकारने २०११ पासून बंदी घातली होती. दरम्यान, २०१९ मध्ये ही बंदी उठली आहे. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती झालेली नाही.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये नवीन शिक्षक भरतीऐवजी सेवानिवृत शिक्षकांनाच नियुक्ती देण्याचा डाव राज्य शासनाकडून रचला जात आहे.
या शासन निर्णयाला लोकांतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. प्रामुख्याने बेरोजगार डी. एड., बी. एड. धारकांमध्ये या निर्णयाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. प्रहार शिक्षक संघटना तीव्र विरोधाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान, निवृत्त शिक्षक नियुक्तीला पालकांतूनही नाराजी व्यक्त करत या शासन निर्णयाविरोधाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात गेल्या तब्बल १० ते १२ वर्षांपासून प्राथमिक शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. परिणामी, प्राथमिक शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. चालू शैक्षणिक वर्षात प्राथमिक शाळांमध्ये मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांमधूनच शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतनासह दरमहा २० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वयोमर्यादा ७० वर्षे करण्यात आली आहे. या सेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीला प्रहार शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शासनाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत वाढत्या वयोमानाचा क्रियाशीलतेवर परिणाम होऊ शकतो. यासाठी सरकारने शिक्षकांच्या रिक्त जागेवर नव्या तरुण शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे. डी.एड. (टीईटी ) उत्तीर्ण हजारो युवक बेरोजगार आहेत. त्यांच्या नियुक्तीसाठी सरकारने प्राधान्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांना कामाची गरजच नाही, असा ठाम विरोध महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना कडून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील लाखो डी एड व बी एड पदवी प्राप्त शिक्षक हे बेरोजगार आहेत. त्यांना नोकरी देऊन गुणवत्ता वाढीसाठी या नविन शिक्षकांचा उपयोग होईल व लाखो नविन बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होतील.
जिल्हा परिषद शाळांमध्ये रीक्त जागेवर सेवानिवृत्त शिक्षक मानधनावर नेमणूक करणे. १२ वर्ष नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या डी एड व बी एड पदवी प्राप्त शिक्षकांना आणखी बेरोजगारीत ढकलून अन्याय करणे आहे. त्यामुळे नविन शिक्षकांनाच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी काम करण्याची संधी द्यावी. काही शिक्षक निवृत्तांमध्ये आधुनिकतेचा अभाव प्राथमिक शिक्षकांसाठी घातलेली संगणक प्रशिक्षणाची (एमएस सीआयटी) अट रद्द करावी, अशी आग्रही मागणी प्रहार शिक्षक संघटना करत आहेत; परंतु आज आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. असे असताना काही सेवानिवृत्त शिक्षकांकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने त्यांची फेरनियुक्ती करणे योग्य नसल्याचा सूर उमटत आहे. सेवानिवृत्त शिक्षकांची फेरनियुक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या ई-मेल निवेदनाद्वारे त्यांनी या भरतीला विरोध केला आहे. प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हा अध्यक्ष गोपाल गावीत यांनीही या शासन निर्णयाला विरोध करत बेरोजगार तरुणांना नोकरीपासून वंचित न ठेवता त्यांना नोकरी देऊन सामाजिक असंतोष दूर करावा,
अशी मागणी केली आहे.निवृत्त होणाऱ्या सर्व शिक्षकांना नवतंत्रज्ञान अवगत असेलच असे नाही. याचा परिणाम अध्यापनावर होणार आहे. सेवानिवृत्तांच्या नियुक्तीच्या विरोधात या बेरोजगार युवकांना संघटित करून तीव्र लढा उभारला जाईल. हा असा इशारा निवेदनात प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी दिला आहे.








