नाशिक l प्रतिनिधी
फेब्रुवारी -मार्च 2022 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी ) परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं .17) ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी 12 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी ) परीक्षेचे नाव नोंदणी भरलेल्या अर्जाची विद्यार्थ्यांनी प्रिंट काढून 14 ऑक्टोंबर,2021 पर्यंत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र, शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जमा करावी. तसेच संबंधीत संपर्क केंद्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्राप्त सर्व अर्ज यादी व शुल्कासह दि. 18 ऑक्टोंबर,2021 रोजी संबंधित विभागीय मंडळात जमा करावेत.
प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.sscboardnashik.com या संकेतस्थळावर मराठी व इंग्रजीमधून सुचना व माहितीपत्रक देण्यात आले असून ते वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. तसेच दहावीसाठी अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in व बारावीसाठी अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-hsc.ac.in याप्रमाणे संकेतस्थळ उपलब्ध आहे.
इयत्ता दहावीच्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्क रुपये एक हजार व प्रक्रिया शुल्क रु. 100 व इयत्ता बारावीसाठी खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्क रुपये पाचशे व प्रक्रिया शुल्क रु. 100 याप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे, असेही श्री. राजेंद्र अहिरे यांनी कळविले आहे.