नंदूरबार l प्रतिनिधी

भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र नंदुरबार यांच्या वतीने युवा महोत्सव संपन्न झाला.
या महोत्सवाचे उद्घाटन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल व भारतीय मानक ब्युरोचे सह-संचालक सत्येंद्र पांडेय यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. अमोल बागुल यांनी आपल्याभाषणात युवकांनी आपली भाषा संस्कृतीचे जतन व संवर्धन केले पाहिजे. अशा सांस्कृतिक कार्याक्रमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले पाहिजे. असे प्रतिपादन केले.
युवा उत्सवाचा समारोप जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
त्यांनी आपल्या समारोपीय भाषणात स्पर्धकांचे कौतुक केले. आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील युवकांमध्ये वेगवेगळे कलागुण आहेत. युवकांनी देश पातळीवर जिल्ह्याचे नाव लौकिक केले पाहिजे आणि यासाठी असे मंच आपल्यासाठी उपलब्ध असतात आपण याचा उपयोग केला पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे होते.
यावेळी पोलीस उपअधिक्षक संजय महाजन, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
युवा महोत्सवात समूह नृत्य, चित्रकला, मोबाईल फोटोग्राफी, वक्तृत्व, काव्य लेखन या पाच कला प्रकारात १२१ युवक व १०३ युवती असे एकूण २२४ स्पर्धकांनी नोंदणी केली होती.
सदर महोत्सवास सायबर गुन्हे शाखा नंदुरबार, जिल्हा आरोग्य केंद्रातील एड्स नियंत्रक विभाग, जिल्हा क्रीडा विभाग, भारतीय मानक ब्युरो, तंबाखू नियंत्रण विभाग, या विभागांनी युवकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र लावले होते.
युवा महोत्सवाचे आयोजन नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अशोककुमार मेघवाल यांनी केले. तर संयोजन कार्यक्रम अधिकारी सुनील पंजे यांनी केले. महोत्सव यशस्वितेसाठी परीक्षकांनी विशेष परिश्रम घेतले..









