नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील अल्पसंख्यांक व अल्पभाषिक शाळांची व संस्थांची चौकशी करण्याची मागणी आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयात 2008 पासून अल्पभाषिक किंवा अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या शाळांची संख्या खुपच वाढली असून ज्या शाळांना अल्पसंख्यांक दर्जा आहे , अशा शाळा व संस्थांमध्ये खरंच अल्पभाषिक किंवा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते काय ? हे पाहणे गरजेचे असून नंदुरबार जिल्हयात गेल्या साठ वर्षांपासून अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत असून या शैक्षणिक संस्था पूर्णतः शासनाच्या अनुदानावर सुरु आहेत . नंदुरबार जिल्ह्यातील नावलौकीक तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या संस्था असून या संस्थांना २००८ सालानंतर अचानक अल्पसंख्यांक किंवा अल्पभाषिक संस्था ( हिंदी भाषिक , गुजराथी भाषिक ) म्हणून महाराष्ट्र शासनाने कशी मान्यता दिली ?
याचीही चौकशी होणे गरजेचे आहे . कारण या संस्थांमधून गोरगरीबांची मुले आधी शिक्षण घेत होते . राज्य घटनेच्या आरक्षणानुसार या संस्थांमध्ये एस.सी. , एस.टी. , ओबीसी , दिव्यांग अशा घटकांच्या आरक्षणानुसार कर्मचाऱ्यांची भरती होत होती . नावाजलेल्या संस्था चालकांना सन २००८ नंतर आपल्या संस्था अल्पभाषिक मान्यता मिळवून आरटीआय शिक्षण हक्क तसेच राज्य घटनेच्या आरक्षण संपविण्याचा घाट अशा मातब्बर शिक्षण संस्थांनी का म्हणून अवलंबला असेल ? हा मोठा संशोधनाचा विषय असून मंत्रालयातून परवानगी देत असताना या शिक्षण संस्थांची सखोल चौकशी का झाली नाही ? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे . मंत्रालयातून जर अशी अल्पसंख्यांक भाषिक मान्यता प्राप्त संस्थेची खिरापत कोण वाटत आहे ? याचीही चौकशी व्हावी .
कारण या प्रकरणामुळे महाराष्ट्रात शिक्षण हक्क कायदा आणि नोकरीत आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा मोठा घाट रचला जात आहे . तरी सोबत यादी दिलेल्या संस्थांची सखोल चौकशी होवून सदर संस्था चालकांवर राज्य शासनाची फसवणूक केल्याबाबत तसेच राज्य घटनेच्या तरतुदींशी छेडछाड केल्याबाबत गुन्हे दाखल करुन संस्था चालकांना राज्य घटनेनुसार शिक्षण व आरक्षण देणे भाग पाडून भविष्यात शिक्षण व आरक्षण याविषयी अशा संस्था चालकांकडून होणारी घटनेची पायमल्ली त्वरीत थांबवावी अशी मागणी आम आदमी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपिन पाटील, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील उपस्थित होते.








