नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून पावसाचा जून महिना कोरडा जाण्याची परंपरा यावर्षीही खरी ठरली आहे. अखेर जून महिन्याच्या दोन दिवस अखेर नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून नवापूर तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात शहरापासून अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील फरशी पूल, रस्ते वाहून गेल्याने दळणवळणाची समस्या निर्माण झाली आहे. नवापूर पिंपळनेर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात बनवलेला फरशी पूल वाहून गेल्याने रस्ता बंद झाला आहे.
त्याचप्रमाणे वडखुट कोलदा गावादरम्यान काही दिवसांपूर्वी बनवलेला रस्ता व फरशी पूल पहिल्याच पावसात खचल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. एकूणच कोटी रुपयांची कामे पहिल्याच पावसात नादुरुस्त झाली असतील तर आणखी संपूर्ण पावसाळा कसा निघेल? तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करेल का असा प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
एकूणच नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. आता शेती कामांना वेग येणार असून पेरणीला देखील सुरुवात होणार आहे. मात्र पावसाच जून महिना कोरडा गेल्याने पुढील तीन महिन्यात पाऊस कसा पडेल याबाबत आश्चर्य व्यक्त करत उत्पादनात घट होण्याची भीती देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. नवापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे.








