नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नवापूर चौफुली येथे नोकरी लावून देण्याचे आमीष देत दोघा भावांकडून २२ लाख ५१ हजार रुपये घेत नोकरी न लावून देता फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील निजामपूर येथील अजय जगन्नाथ बहिरम व त्यांच्या भावास पंडीत छगन पवार (रा.गंगापूर ता.नंदुरबार) याने नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करीत वेळोवेळी २३ लाख रुपये घेतले. त्यापैकी ४९ हजार रुपये पंडीत पवार याने परत केले.
उर्वरित रक्कम २२ लाख ५१ हजार रुपये परत न करता अजय बहिरम व त्यांच्या भावाचा विश्वासघात करुन फसवणूक केली. तसेच दमदाटी केली. याबाबत अजय बहिरम यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पंडीत पवार याच्याविरोधात भादंवि कलम ४०६, ४२०, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत.








