नंदुरबार | प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील विविध पदांसाठी होणारी परीक्षा राज्य शासनाने अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे हाल झालेत. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे परीक्षा केंद्रांवर पोहचले. मात्र परीक्षा रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांच्या चेहर्यावर नैराश्य पसरले. या सार्या प्रकाराला महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे.,असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला.
आरोग्य विभागाच्या क आणि ड पदांसाठी शनिवारी व रविवारी परीक्षा होत्या. यासाठी नंदुरबार शहरात विविध परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र सोबत घेत ग्रामीण भागातील विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी गेले होते. परीक्षा रद्द झाल्याचे त्यांना आजच कळाले. काल रात्री ९ ते १० च्या सुमारास अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्या. यासारखे दुर्देव काय? मुले परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचण्यासाठी नंदुरबारला मुक्कामी आले होते.यासाठी त्यांना भाडे खर्च करावा लागला. लॉजमध्ये पैसा दयावा लागला. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या गचाळ नियोजनाचा अनुभव विद्यार्थ्यांना आला.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतप्त भावना उमटल्या आहेत.
अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय का घेण्यात आला? महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव तर आहेच. शिवाय एवढा नियोजनशुन्य कारभार यापुर्वी कधीच अनुभवायला मिळालेला नाही. मुलांची मानसिकता खराब झाली. तसेच आर्थिक भुर्दंड लागला ,याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या नाकर्ते सरकारच्या धोरणाचा भाजपाच्यावतीने निषेध करतो. विद्यार्थ्यंाच्या भावनेशी खेळणारे हे सरकार अधिक काळ टिकणार नाही. सरकारला नक्कीच या विद्यार्थ्यांचा शाप लागेल,असेही विजय चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे.अनेक आई बापांनी मुलांच्या परीक्षेसाठी देवाकडे साकडे घातले . परीक्षा चांगली जावी यासाठी आशीर्वाद दिले. मात्र ऐन वेळेस परीक्षा रद्द झाल्याने सर्वांच्या आकांक्षांवर पाणी फेरले गेले आहे.याला जबाबदार कोण? असा संतप्त सवालही भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.