नंदुरबार l

महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाजसेविका आणि स्वयंसेवी संस्थांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी 5 जुलै,2023 पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वर्ष 2020-21,2021-22,2022-23, व 2023-2024 या वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील महिला व बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 7 वर्ष कार्य केलेल्या नामांकित समाजसेविकांना जिल्हास्तर पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 25 वर्ष कार्य करीत असलेल्या नामांकित समाजसेविकांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येईल. तर महिला व बालकल्याण क्षेत्रात महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी व शिक्षण पुनर्वसन इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच राजकारणापासून अलिप्त असलेल्या व दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला नाही अशा स्वयंसेवी संस्थांना विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी अर्ज करावेत.
पुरस्कारासाठी पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज तीन प्रतीत बुधवार 5 जुलै,2023 पर्यंत सादर करावा. पुरस्काराच्या अधिक माहिती व विहीतनमुना अर्जासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र.226, टोकरतलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210047 वर संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.बिरारी यांनी दिली आहे.









