नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावरुन एका चार चाकी वाहनातून गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करत असतांना पोलीसांनी वाहनासह गुटखा असा सुमारे सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात नंदुरबार तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील किशोर हिलाल कोळी व हेमंत छगन कोळी असे दोघेजण त्यांच्या ताब्यातील वाहनामधून (क्र.एम एच ४३ एजे) खाण्यास अपायकारक असणाऱ्या प्रतिबंधीत विमल पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी सदरचे वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यात एक लाख १२ हजार २०० रुपयांचा केसरयुक्त पान मसाल्याचे ६०० पाऊच, १९ हजार ८०० रुपयांचे व्ही-१ टोबॅको चे ६०० पाऊच, ४३ हजार ५६० रुपयांचे केसरयुक्त विमल पान मसाल्याचे २२० पाऊच, २४ हजारांचे विमल पानमसाल्याचे २०० पाऊच सह विविध गुटखाजन्य पदार्थ असा सुमारे दोन लाख १५ हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल व ७ लाख रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे नऊ लाख १५ हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोना.बापू गोवा बागुल यांच्या फिर्यादीवरुन संशयित किशोर कोळी व हेमंत कोळी यांच्या विरोधात भादंवि कलम १८८,२७२,२७३,३२८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.








