नंदूरबार l प्रतिनिधी
अक्षता सेल व महिला बालविकास विभाग यांना संयुक्तीकपणे सोनवद येथील बालविवाह रोखण्यात यश आले आहे
दि. 12 जुन 2023 रोजी चाईल्ड लाईन या संस्थेचा हेल्पलाईन क्रमांक 1098 वर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांना माहिती मिळाली की, शहादा तालुक्यातील सोनवद येथील एका अल्पवयीन मुलीचा मालपूर ता. शिंदखेडा जि. धुळे येथील तरुणाशी 13 जुन 2023 रोजी होणार आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना सांगितली. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदरची माहिती शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कळवून सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी शहादा पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य, चाईल्ड लाईन संस्था, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील सदस्यांच्या मदतीने माहिती काढली असता, सोनवद गावातील एका अल्पवयीन मुलीचा मालपूर ता. शिंदखेडा जिल्हा धुळे येथील एका तरुणासोबत 13 जुन 2023 रोजी बालविवाह होणार असल्याचे व 12 जुन 2023 रोजीच संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होणार असल्याचे समजले,
परंतु त्यापूर्वीच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, तिचे कुटुंबीय व गावातील नागरिक यांच्या कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करुन त्यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले.
सोनवद येथील अल्पवयीन मुलीचे पालक व गावातील नागरिकांचे बालविवाहाबाबत समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच तेथे कार्यक्रमाला उपस्थित असलेले नातेवाईक व नागरिकांना बालविवाहाबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन जनजागृती केली. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना शहादा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.
सदर अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती नंदुरबार यांचे समक्ष हजर करून तिचे व तिच्या कुटुंबीयांचे सदर समितीमार्फत समुपदेशन करुन सदर अल्पवयीन मुलगी 18 वर्षे वयाची होई पर्यंत तिचे शिक्षण, आरोग्य व कल्याणाची जबाबदारी सदर समितीमार्फत घेतली जाईल, जेणेकरुन सदर अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षताचे नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. नंदुरबार जिल्हा पोलीसांना ऑपरेशन अक्षतांतर्गत तब्बत 26 बालविवाह रोखण्यात यश आले आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, महिला व बाल विकास विभागाचे गौतम वाघ, शहादा तालुक्याचे संरक्षण अधिकारी श्री. निकुम, चाईल्ड लाईनच्या श्रीमती मेघा पाटील, सोनवद गावाचे पोलीस पाटील यांनी केली आहे.
बालकांचा विवाह करणे हा कायदेशीर गुन्हा असून तो करणाऱ्या व्यक्तीवर तसेच विवाहात हजर असणाऱ्या वऱ्हाडी, बैंड पथक, विवाह लावणारे भटजी, आचारी, मंडप डेकोरेटर्स यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपल्या परिसरात बालविवाह होत असेल त्याबाबतची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा ऑपरेशन हेल्पलाईन क्रमांक 9022455414 व चाईल्ड लाईन हेल्पलाईन क्रमांक 1098 यावर संपर्क साधवा असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.








